Sun, Mar 24, 2019 12:26होमपेज › Sangli › उसाच्या फडास लागलेल्या आगीत वृद्धेचा होरपळून मृत्यू

उसाच्या फडास लागलेल्या आगीत वृद्धेचा होरपळून मृत्यू

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 28 2018 12:48AMइस्लामपूर : शहर वार्ताहर

कापूसखेड येथील वैजयंता राजाराम धुमाळे (वय 70, रा. कापूसखेड) या वृद्धेचा उसाच्या फडास लागलेल्या आगीत  होरपळून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. गेल्या 15 दिवसांपासून त्या बेपत्ता  होत्या. आज त्यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. 

वैजयंता धुमाळे  दि. 13 फेब्रुवारीपासून  बेपत्ता होत्या. तशी फिर्याद त्यांच्या मुलाने इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी कापूसखेड येथील भिकाजी मळा परिसरातील उसाच्या फडाला शॉर्ट सर्किटने आग लागली होती. यामध्ये सुमारे 25 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला होता. 

आज या परिसरात बी.आर. पाटील यांच्या शेतात ऊसतोड मजूर ऊस तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका मजुराला अर्धवट जळालेला मृतदेह दिसला. ची माहिती पोलिस पाटील प्रदिप बल्‍लाळ यांनी इस्लामपूर पोलिसांना दिली. जळालेला मृतदेह हा बेपत्ता झालेल्या वैजयंता धुमाळे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. रात्री उशिरा त्यांच्या मृतदेहाचे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वैजयंता यांचा मृत्यू होरपळून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल शिंदे तपास करीत आहेत. मृत वैजयंता यांच्या पश्‍चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.