Wed, Apr 24, 2019 21:30होमपेज › Sangli › अधिकारी, कर्मचार्‍यांच्या दांड्या!

अधिकारी, कर्मचार्‍यांच्या दांड्या!

Published On: May 14 2018 1:40AM | Last Updated: May 13 2018 7:44PMसांगली : प्रतिनिधी

येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील काही कार्यालयांतील  अधिकारी, कर्मचारी   दांड्या मारत आहेत.  अनेकजण कधी उशिरा येतात तर कधी लवकर घरी जातात. काही कार्यालयात लावण्यात आलेले थंब मशीनही  गायब झाल्याने कर्मचार्‍यांची मनमानी सुरू आहे. तर याकडे   वरिष्ठ  अधिकार्‍यांचेही दुर्लक्ष आहे. विजयनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मध्यवर्ती प्रशासकीय  इमारत आहे. या इमारतीत राज्य सरकारच्या अखत्यारीतील कृषी, अन्न आणि औषध प्रशासन, महिला व  बालकल्याण, सुशिक्षित रोजगार नोंदणी आणि मार्गदर्शन, जिल्हा सहकार उपनिबंधक, वैधमापन, भूमि अभिलेख, नगररचना, जिल्हा सांख्यिकी आदी विभागाची कार्यालये आहेत. यातील बहुतेक कार्यालये ही पूर्वी सांगली शहरात विविध ठिकाणी भाड्याच्या जागेत होती. त्यावेळी अनेकांना  ही कार्यालय नेमकी कोठे आहेत आणि काय करतात, याची माहिती होत नव्हती. मात्र आता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ही कार्यालये चर्चेत आली आहेत. 

अर्थात कार्यालये चर्चेत आली असली तरी  कारभार मात्र सुधारला नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. कारण या ठिकाणी बहुतेक कार्यालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित असतात.  महिन्याच्या  दुसर्‍या आणि चौथ्या शुक्रवारी अनेक  विभागाची कार्यालय दुपारी तीननंतर ओस पडतात. नागरिकांनी चौकशी केल्यानंतर अधिकारी बैठकीसाठी बाहेर गेले असल्याचे  किंवा रजेवर असल्याचे उत्तर दिले जाते. आता दोन दिवस सुट्या आहेत. त्यामुळे  साहेबांना लांब जायचे   असल्याने लवकर गेले आहेत, असेही उत्तर काही  कर्मचारी देतात. अधिकारी, कर्मचार्‍यांच्या नोंदी घेण्यासाठी थंब मशीन  बसवले , मात्र काही दिवसात अनेक कार्यालयातून ते   गायब झाले आहे.

दांड्या मारणार्‍यांवर कारवाई करा : औंधकर 

उच्च शिक्षण घेऊन देखील तरुणांना  नोकर्‍या नाहीत. अशावेळी भरमसाठ पगार घेणारे  अनेक अधिकारी, कर्मचारी मनमानी  करत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण गरजेचे आहे. दांड्या मारणार्‍यांवर कारवाईची मागणी  संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सुयोग औंधकर यांनी केली आहे. 

अनेक अधिकार्‍यांकडे अतिरिक्त कार्यभार

मे  हा शाळांच्या सुटीचा  महिना असल्याने शासकीय कार्यालयांत सध्या सुट्यांचा ‘फिव्हर’ चांगलाच बळावला आहे. अनेक अधिकारी सध्या रजेवर आहेत. त्यामुळे एका अधिकार्‍यांकडे तीन- चार विभागांचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे काम करताना त्यांना मर्यादा येत आहेत. तर यातून लोकांची देखील गैरसोय होत आहे.