Sat, Mar 23, 2019 16:08होमपेज › Sangli › अधिकारी, ठेकेदार नगरसेवकांनी शहराला लुटले

अधिकारी, ठेकेदार नगरसेवकांनी शहराला लुटले

Published On: Jan 04 2018 1:03AM | Last Updated: Jan 03 2018 11:43PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी 

भ्रष्ट अधिकारी, ठेकेदार   आणि  कारभार्‍यांनी गेल्या अनेक वर्षांत महापालिकेला लुटले.  त्यांनी  त्यांच्या  नेत्याच्या समाधी, पुतळ्यालाही सोडले नाही, असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केला. मनसेच्यावतीने बुधवारी महापालिकेच्या दारात ‘भ्रष्ट कारभार्‍यांनो चालते व्हा’ अभियान सुरू केले. त्याप्रसंगी  ते बोलत होते.    

प्रदेश उपाध्यक्षा अ‍ॅड. स्वाती शिंदे, शहराध्यक्ष अमर पडळकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनिता इनामदार, रोहित घुबडे, स्वप्नील कुंभोजकर, अजय काकडे,विजय मौर्य, प्रवीण काकडे, गजानन मोरे, प्राची कुदळे, चैतन्य पेटकर, अस्लम शेख, विजय चौगुले,बाजीराव गस्ते,सुनिता भोसले, राधाबाई पवार,कल्पना जाधव आदी सहभागी झाले होते.

शिंदे म्हणाले, महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी विकास आघाडी, उपमहापौर गट सारे मिळून संगनमताने भ्रष्टाचार करीत आहेत. नगरसेवकच ठेकेदार बनले आहेत. विकासकामांच्या नावे महापालिकेच्या तिजोरीवर दरोडेखोरी सुरू आहे.  काही भानगडबाज कारभारी भ्रष्ट अधिकार्‍यांना हाताशी धरून शेकडो कोट्यावधीचा भ्रष्टाचार करीत आहेत. वर्षानुवर्षे घोटाळ्यांची मालिकाच सुरू आहे. ते म्हणाले, लुटता- लुटता या कारभार्‍यांनी (स्व.) मदन पाटील यांच्या समाधी, पुतळ्यालाही सोडले नाही. पुतळा उभारणीत लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला आहे.

शिंदे म्हणाले, यामुळे नगरसेवकांचा विकास झाला आहे, मात्र लुटारूंनी तीनही शहरे भकास केली आहेत. ठेकेदार नगरसेवकांनी लुटीसाठी कामाचा दर्जाही निकृष्ट ठेवला आहे. या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात मनसेने आंदोलन सुरू केले आहे. या महापालिकेतील भानगडीचा पंचनामा भागा-भागात जाऊन करणार आहोत.