सांगली : प्रतिनिधी
आर्थिक उत्पन्न वाढीसाठी सांगलीचा प्रसिद्ध शेरीनाला सिंगापूरला पाठविण्याचा ठराव मनपाच्या अभिरूप महासभेत (अधिकारी-पदाधिकारी खांदेपालट करून सभा) करण्यात आला. हे पाणी औषधासाठी साडेपाचशे रुपये बाटली दराने विकले जाणार असल्याचा ठराव या सभेत करण्यात आला. महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी ही अभिरूप महासभा हास्याचे कारंजे फुलविणारी ठरली. सभागृहात उपस्थित अक्षरश: लोटपोट झाले.
यावेळी सांगली व मिरजेच्या कचरा डेपोच्या ठिकाणी गाजर व रताळाची शेती करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या सभेत अधिकारी व नगरसेवकांनी एकमेकांची हुबेहुब नक्कल केली. खर्या महासभेत रंगणार्या वाद, घोषणाबाजी आणि खडाजंगीचाही ‘वग’ चांगला रंगविण्यात आला. यावेळी पाच सदस्यांना निलंबनाचीही घोषणा करण्यात आली.
अभिरूप सभेचे अध्यक्षस्थान महापौर म्हणून आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी स्वीकारले होते. तर आयुक्त म्हणून महापौर हारूण शिकलगार, नगरसचिव म्हणून नगरसेवक राजेश नाईक, उपमहापौर म्हणून नकुल जकाते, गटनेते किशोर जामदार म्हणून उपायुक्त सुनील पवार यांनी भूमिका बजावल्या. चंद्रकांत आडके, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांच्या भूमिकेत, तर विद्युत अभियंता अमर चव्हाण नगरसेवक संतोष पाटील यांच्या भूमिकेत आक्रमक होते.
गेल्यावर्षीच्या अभिरूप सभेत सांगलीत समुद्र आणण्याचा विषय मंजूर झाला होता. याबाबत काय झाले? अशी विचारणा आडके, डॉ. सुनील ताटे यांनी केली. यावर पाणीपुरवठा अभियंत्याची भूमिका साकारणारे नगरसेवक गौतम पवार म्हणाले, समुद्र सांगलीत आणण्यासाठी रावण या कंपनीला काम देण्यात येणार आहे. या उत्तरावर एकच हशा पिकला.
सभेत सांगलीच्या शेरीनाल्याचे पाणी सिंगापूरला देवून, तेथून सांगलीला पाणी आयात करण्याचा विषय आला. यावर जाब विचारताच गौतम पवार म्हणाले, ही नेहमीप्राणे प्रिटिंग मिस्टेक आहे. सांगलीच्या शेरीनाल्याचे पाणी औषधी असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सिंगापूरला पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे.
आयुक्तांनी या विषयाला मंजुरी दिली तर पैसे कोणाच्या खिशात जाणार? याबाबत आम्ही बसून चर्चा करू, असे खेबुडकर म्हणताच सभागृहात हास्याचे कारंजे उडाले. सांगली व मिरजेच्या कचरा डेपोमध्ये रताळ शेती करण्याचा विषय सभेत आला. सदस्यांनी रताळाचीच शेती का? असा सवाल केला. यावर डॉ. आंबोळे यांच्या भूमिकेत असलेल्या स्थायी समिती बसवेश्वर सातपुते यांनी मला सहीचा अधिकारच नाही, विषय माहीत नाही असे सांगताच हास्यकल्लोळ झाला.
उपायुक्त स्मृती पाटील यांच्या भूमिकेत असलेल्या अनाकरली कुरणे म्हणाल्या, उपवासाचे दिवस असल्याने रताळाची शेती केली आहे. ते मोफत वाटप होईल. मात्र मिरजेत गाजराची शेती करा, असे मिरज सदस्यांनी सांगितले.
जकाते यांनी उपमहापौरांप्रमाणे डायस सोडून खाली उतरत दंगा केला. त्यांच्यासह इतरांनी गोंधळाची नक्कल करत सभा बंद पाडण्याचा प्रयत्न केला. महापौरांच्या पीठासनासमोर ठिय्या मारला. यावेळी महापौरांनी पाच सदस्यांचे निलंबन करण्याचे आदेश दिल्यानंतर सर्व सदस्य शांत झाले. शांत झाल्याने त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. तर मिरज प्रमाणे सांगलीच्या सदस्यांना अमृतयोगचा लाभ देण्याचा विषयावर सभागृहात जल्लोष झाला.