Tue, Jun 18, 2019 22:31होमपेज › Sangli › कामचुकार कर्मचार्‍यांचा निलंबन प्रस्ताव द्या

कामचुकार कर्मचार्‍यांचा निलंबन प्रस्ताव द्या

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 22 2018 10:51PMसांगली : प्रतिनिधी

सिटी सर्व्हे विभागातील कामचुकार आणि कामात हेतूपर्वक टाळाटाळ करणार्‍या कर्मचार्‍यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तातडीने तयार करून द्या. तुमच्या विभागात येणार्‍या नागरिकांना चांगली वागणूक देऊन त्यांची कामे ठराविक मुदतीत पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांनी आज येथे दिले. सिटी सर्व्हे विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. भाजपचे नेते श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या कामासंदर्भात अनेक वेळा पाठपूरावा केला. काम होणार की नाही, असा जाबही विचारला. त्यावर या विभागातील कर्मचार्‍यांनी काळ्याफिती लावून एक दिवस लेखणी बंद आंदोलन केले होते. भाजपचे काही पदाधिकारी त्रास देत असल्याचा आरोप केला होता. 

शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आजच्या बैठकीची आयोजन केले होते. नागरिकांनाही बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. यावेळी प्राथमिक स्वरुपात  पाच नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. इतर नागरिकांची निवेदन घेऊन त्यासंदर्भात ठराविक मुदतीत  प्रकरणे निकालात काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी पाटील यांनी सिटी सर्व्हेविभागाच्या नगररचनाकार रोहिणी सागरे यांना दिले. जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, नागरिकांचे म्हणणेे ऐकून घ्या. प्रशासनास शोभेल असे चांगले वर्तन ठेवा. नागरिकांशी उर्मट आणि उद्धट वागू नका. विनाकारण फेर्‍या मारायला लावू नका.  कामे होत नसतील तर त्यांना स्पष्ट सांगून   तसे लेखी   द्या.  विनाकारण कोणाचीही हेतूपूर्वक अडवणूक करू नका. तसे कोणी करीत असेल तर त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव द्या. सिटी सर्व्हेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तो प्रस्ताव मी पाठवून देईन.

नागरिकांना अर्ज आता दिवसभर देता येणार

सिटी सर्व्हे विभागात येणार्‍या नागरिकांना आतापर्यंत सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेतच  अर्ज देता येत होते. याबाबत नागरिकांनी तक्रार केली. जिल्हाधिकारी पाटील यांनी  कार्यालयीन वेळेत दिवसभर नागरिकांना अर्ज सादर करता येतील, असे सांगितले. 

जिल्हाधिकारी पाटील यांचा विशेष सत्कार

जागतिक योगदिना नमित्त बालगाव येथे शिबीर घेण्यात आले. त्याचे चांगले संयोजन केल्यामुळे विश्‍वविक्रमी नोंद झाली. सांगलीच्या दृष्टीने ही ऐहिहासिक घटना आहे. याबद्दल नागरिकांच्यावतीने जिल्हाधिकारी पाटील यांचा सत्कार करण्यात आला.