होमपेज › Sangli › ईव्हीएमची आठवण पहिली त्यांना का?

ईव्हीएमची आठवण पहिली त्यांना का?

Published On: Aug 06 2018 1:55AM | Last Updated: Aug 05 2018 11:00PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आघाडीतील एकानेही ईव्हीएम मशीन बाबत शंका उपस्थित केली नव्हती की आरोप केला नव्हता. असे असतानाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच जिंकल्यानंतरही ईव्हीएमची आठवण पहिल्यांदा का आली असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. निकालापूर्वीच त्यांनी सांगलीत भाजपच्या 42 जागा येतील असे भाकित खरे ठरल्याचा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला. 

जयंत पाटील म्हणाले, निकालानंतर आघाडीमधील एकाने ईव्हीएम घोटाळ्याने पराभव झाला असे वक्तव्य केल नव्हते. तरीही विजयी होऊनही चंद्रकांत पाटलांना त्याची आठवण यावी याचे आश्‍चर्य वाटते. शिवाय पैशांचे वाटप केल्याबाबतही आरोप कोणीही केला नव्हता. तरीही त्यांनीच तो सर्वात आधी का केला याचेही आश्‍चर्य वाटते. ते म्हणतात भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाही. मग गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार केलेल्यांना उमेदवारी देताना ते भ्रष्टाचारमुक्त झाले का असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

पाच वर्षात सत्तेत असलेल्यांना उमेदवारी देणे त्यांच्या कोणत्या सुत्रात बसते. पैशांचा वापर केल्याचा आरोप आम्ही केला नाही मात्र कार्यकर्त्यांना भेटवस्तू वाटपाच्या सूचना कोणाच्या होत्या हे सूज्ञ सांगलीकर जाणतात. 15 ते 20 दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत 42 जागा निवडून येतील असे भाकित केले होते. ते खरे ठरले. इतका चांगला अंदाज त्यांना निवडणुकीआधी कसा आला याचे आश्‍चर्य वाटते असेही पाटील यावेळी म्हणाले. 

निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी पक्षाने ईव्हीएम मशीनच्या चाचणीची मागणी केली होती. व्हीव्हीपॅटचीही मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचीही मागणी पक्षातर्फे करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाने आमची एकही मागणी मान्य केली नाही. सर्व मागण्या फेटाळून लावल्या.

देशातील सर्वच पक्ष आता ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यासाठी विरोध करत आहेत. इथून पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्यास विविध पक्षातून भाजपमध्ये गेलेले सर्वजण स्वपक्षात परत येतील असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.  

तो पेढा लोकसभेचा की विधानसभेचा

चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणूकीसाठी खासदार संजय पाटील यांना पेढा भरवून शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यावर कवठेमहांकाळ-तासगाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली. खासदाराला फक्त एका विधानसभेची जबाबदारी देणे जरा आश्‍चर्यकारक आहे. त्यामुळे त्यांनी भरवलेला पेढा लोकसभेसाठी की विधानसभेसाठी असा प्रश्‍नही पाटील यांनी उपस्थित केला. 

काँग्रेसमुक्त सांगली शक्य नाही

चंद्रकांत पाटील यांनी येत्या निवडणुकीत काँग्रेसमुक्त सांगली करू अशी वल्गना केली आहे. या निवडणुकीत आघाडीला 47 टक्के मते मिळाली आहेत. 66 टक्के जनतेने भाजपला नाकारले आहे. शिवाय आघाडीच्या नेत्यांमधील समन्वयही चांगला होता. त्यामुळे काँग्रेसमुक्त सांगली ही त्यांची केवळ वल्गनाच राहील असेही पाटील यावेळी म्हणाले. 

पुढच्या निवडणुकीतही आघाडीच

राज्यातील निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची सांगलीत पहिली पायरी होती. आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत आघाडी धर्म प्रामाणिकपणे पाळला आहे. यापुढे महाराष्ट्रात होणार्‍या सर्व निवडणुकांमध्ये आघाडी केली जाईल. असेही पाटील यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.