Wed, Nov 21, 2018 23:31होमपेज › Sangli › इस्लामपूरच्या नूतन तहसील इमारतीचेे उद्घाटन लांबणीवर

इस्लामपूरच्या नूतन तहसील इमारतीचेे उद्घाटन लांबणीवर

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 06 2018 11:33PMइस्लामपूर : वार्ताहर

येथील तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. मे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या इमारतीचे उद्घाटन होणार होते. आता पलूस, कडेगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक संपल्यानंतर हा उद्घाटन सोहळा होणार आहे. 

येथील तहसील कार्यालयाची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी चार मजली भव्य नवीन इमारत बांधण्यात आली आहे. आमदार जयंत पाटील ग्रामविकासमंत्री असताना त्यांच्या प्रयत्नामुळे या इमारतीला निधी मंजूर झाला होता. तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाला होता. 

या इमारतीचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. फर्निचर व किरकोळ  कामे बाकी आहेत. आता ना. सदाभाऊ खोत व नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी या इमारतीच्या उद्घाटनाचे निमित्त साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इस्लामपुरात आणून कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचे नियोजन केले होते. याचवेळी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते वाघवाडी येथे मंजूर झालेल्या क्रांतिसिंह नाना पाटील कृषी महाविद्यालयाचे  व इस्लामपूर शहराच्या 24/7 पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व सहकार न्यायालयाचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार 
होते. 

20 मे दरम्यान या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र तत्पूर्वी पलूस, कडेगाव मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीची आचारसंहिता जिल्हाभर लागू झाल्याने हा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर पावसाळ्यापूर्वी हा उद्घाटनाचा कार्यक्रम व भाजपचा मेळावा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे.