Fri, Jul 19, 2019 14:26होमपेज › Sangli › स्वच्छता अ‍ॅपमध्ये सांगली राज्यात ‘नंबर दोन’

स्वच्छता अ‍ॅपमध्ये सांगली राज्यात ‘नंबर दोन’

Published On: Feb 08 2018 1:53AM | Last Updated: Feb 07 2018 10:38PMसांगली : प्रतिनिधी

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी  सांगली, मिरज आणि कुपवाड सज्ज झाली आहे. त्यानुसार शासनाने राबविलेल्या स्वच्छता अ‍ॅपमध्ये महापालिका देशात 21 व्या तर राज्यात दुसर्‍या क्रमांकावर असल्याचे आयुक्‍त रवीद्र खेबुडकर यांनी सांगितले. दि. 20 फेब्रुवारीला स्वच्छ सर्व्हेक्षणाअंतर्गत शासनाचे पथक सांगलीला येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

खेबुडकर म्हणाले, सांगली महापालिका पुन्हा एकदा स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत उतरली आहे. स्वच्छता, कचरा उठाव याबरोबर नागरिकांसाठी स्वच्छ अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले आहे. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जानेवारीपासून अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सुरुवात केली आहे. एक ते दहा लाखापर्यंत लोकसंख्या असणार्‍या शहरांसाठी ही स्पर्धा आहे. आतापयर्ंत 18 हजार120 नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केला आहे. 

ते म्हणाले, नागरिकांचा सहभाग, स्वच्छ अ‍ॅप डाऊनलोड करुन तक्रारी अपलोड करणे, यावरुन शहराचे गुणांकन वाढणार आहे. शहराचे स्वच्छ सर्वेक्षण करण्यासाठी शासनाची टीम 20 फेब्रुवारीला येणार आहे. ही टीम स्वच्छतेबाबत महापालिका राबवत असलेल्या उपाययोजनांची तपासणी करणार आहे. यासाठी काही भागाला भेटी देणार आहेत. नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांच्याशीही चर्चा करणार आहे. देशात 20 नंबरच्या आत महापालिका आली तर किमान 20 कोटी रुपयांचे बक्षीस विकासकामांसाठी शासकीय अनुदानरूपाने मिळणार आहे. या दृष्टीने नागरिकांचा सहभाग सकारात्मक आवश्यक आहे. महापालिकेची स्वच्छता अभियानाबाबतची सर्व कागदपत्रे तपासली जाणार आहेत.