Thu, Jul 18, 2019 04:09होमपेज › Sangli › ‘अनफिट शाळां’वर आता शिक्षिकांची बदली नाही

‘अनफिट शाळां’वर आता शिक्षिकांची बदली नाही

Published On: Jan 30 2018 1:54AM | Last Updated: Jan 29 2018 10:31PMसांगली : प्रतिनिधी

अवघड क्षेत्रातील अनफिट शाळांवर शिक्षिकांची बदली न करण्याबाबत शासन आदेश आला आहे. अवघड क्षेत्रातील महिलांसाठी अनफिट शाळा घोषित करण्याचे निर्देश शासनाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले आहेत. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडील आंतरजिल्हा बदली प्रक्रिया दि. 1 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत पूर्ण करावयची आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेनंतर दि. 15 फेब्रुवारीपासून जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. बदली प्रक्रियेपूर्वी पदोन्नती व समायोजन प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया गेल्यावर्षी बरीच वादग्रस्त ठरली होती. यावेळच्या बदली प्रक्रियेकडेही शिक्षण विभाग व शिक्षकांचे लक्ष लागले आहे. 

जिल्हांतर्गत बदलीमध्ये महिला शिक्षकांना दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला आहे. अवघड क्षेत्रातील अनफिट असलेल्या शाळांवर महिला शिक्षकांंची बदली करू नये, असे शासन निर्देश आहेत. सांगली जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या 91 आणि कन्नड माध्यमाच्या 8 प्राथमिक शाळा अवघड क्षेत्रातील आहेत. या 99 शाळांपैकी महिलांसाठी अनफिट असलेल्या शाळा घोषित करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविली आहे. 

प्रतिनियुक्त्या रद्द

‘डायट’सह इतर सर्व ठिकाणच्या शिक्षकांच्या प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देशही शासनाने दिलेले आहेत.