Wed, Mar 27, 2019 03:59होमपेज › Sangli › आता ‘मास्टरमाईंड’साठी ‘जवाब दो’ आंदोलन

आता ‘मास्टरमाईंड’साठी ‘जवाब दो’ आंदोलन

Published On: Aug 20 2018 1:39AM | Last Updated: Aug 19 2018 8:58PMसांगली : गणेश कांबळे

“माणसे खपाट खंगलेली, आतून आतून भंगलेली,  अदृश्य दहशतीने तंगलेली, आधार नाही,  प्रत्येकास येथे हवा, कोणीतरी जबरी बुवा, जो काढील सार्‍या उवा, मनातल्या चिंतांच्या, आधी म्हणायचे जय साई, मगचि अधिकारी लाच खाई, अजून पकडला गेला नाही, कृपा मानी बाबांची, आपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही, आपण भिडायचे नाही, आयुष्याला. कणा झिजून गेला पार, शिरजोरापुढे सर्व लाचार. बुवा नामजपाचा उच्चार, नशा देई.”

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या भाषणाची सुरुवात कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या (उ)दासबोध या काव्यसंग्रहातील या कवितेच्या ओळीने असायची. त्यानंतर आपल्या ओघवत्या वाणीने कधी मिश्किलपणे, तर जोरकसपणे बुवाबाजीची एकेक प्रकरणांचा भांडाफोड आपल्या भाषणातून करीत.  देव, धर्म याबद्दलची त्यांची भूमिका कधीच टोकाची नव्हती. ते म्हणायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जे देव आणि धर्माबद्दल जे उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे, त्याला मानणारा मी आहे, पण दुसर्‍या बाजूला संत गाडगेबाबांचे उदाहरण देऊन ‘देव देवळात नसतो, तर देव माणसात असतो, हेही ठामपणे सांगायचे. त्यामुळे त्यांच्याभोवती सर्व धर्माचे कार्यकर्ते गोळा व्हायचे. जातीबद्दल मात्र ते ठाम असायचे.

मानवतेला काळीमा फासणार्‍या जाती या नष्ट झाल्या पाहिजेत, असे त्यांचे मत होते. त्यामुळे जातीअंताच्या लढाईसाठी हिरिरीने भाग घ्यायचे. अनेक संघटनांचे नेते, कार्यकर्त्यांचा केवळ वापर करतात. अनेक वर्षे जीवतोडून संघटनेत काम केल्यानंतर कार्यकर्त्यांजवळ उत्पन्नाचे कोणतेही साधन राहत नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्ते डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. हे ओळखून डॉ. दाभोलकरांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी  सक्‍त ताकीदच दिली होती. ‘पहिले प्राधान्य तुम्ही तुमची नोकरी, व्यवसाय, दुसरे तुमचे कुटुंब आणि त्यातून  वेळ मिळाला तर तो तुम्ही संघटनेसाठी  द्या’  दाभोलकरांच्या या विचारामुळे अंनिसचा कोणताही कार्यकर्ता कधीही डिप्रेशनमध्ये गेला नाही. उलट स्वत:च्या पायावर उभा राहून तो कुटुंबासमवेत आयुष्यभर चळवळ करीत राहिला.

अशा निर्भीडपणे जगणार्‍या डॉ. दाभोलकरांची पाच वर्षांपूर्वी पुण्यामध्ये सकाळी याच दिवशी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या खुन्यांना एटीएसने पाच वर्षाने का होईना अटक केली. 
या पाच वर्षांत डॉ. दाभोलकरांनी आखून दिलेल्या रस्त्यावरून चालणार्‍या त्यांच्या कार्यकर्त्यांनी कधीही संयम सोडला नाही. अंनिसच्या चळवळीमध्ये सर्व विचारांचे, जातीचे कार्यकर्ते काम करतात. त्यांनी कधीही कायदा हातात घेऊन आक्रमक आंदोलन केले नाही. दाभोलकर संविधान मानायचे. कायद्यावर त्यांचा विश्‍वास होता. ही त्यांच्या आजवरच्या वाटचालीच ताकद होती. त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी केवळ बोलण्यातून नव्हे, तर कृतीतून हे दाखवून दिले. शांततेच्या मार्गाने पण सातत्याने आंदोलन करून सरकारचे पोलिस प्रशासनातील त्रुटी अंनिस दाखवत राहिली. आज त्यांच्या या आंदोलनाला यश मिळत आहे. 

दाभोळकरांवर गोळ्या झाडणार्‍या प्रत्यक्ष खुन्यांना अटक करून पोलिस अभिनंदनास पात्र ठरले आहेत. परंतु आता खुनामागे असणारा ‘ब्रेन’ कोणचा आहे, हे शोधणे आता पोलिसासमोर आव्हान राहणार आहे. कारण पोलिसांनी सर्व पुराव्यानिशी खुन्यांना पकडले आता यातील मास्टरमाईंड कोण आहेत, हे ही जनतेसमोर आणले पाहिजे. कारण खून करणारे स्लीपरसेल सापडत आहेत, परंतु त्यांचा मास्टरमाईंड अजून सापडलेला नाही.  तेच पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनाच्या बाबतीत घडले आहे.