होमपेज › Sangli › ‘पीआरसी’च्या झाडाझडतीनंतर अधिकार्‍यांना नोटिसा

‘पीआरसी’च्या झाडाझडतीनंतर अधिकार्‍यांना नोटिसा

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 11:52PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

पंचायत राज समितीकडून (पीआरसी) झालेली झाडाझडती, समितीच्या प्रश्‍न, उपप्रश्‍नांना समर्पक उत्तर देता न येणे, कामकाजातील अनियमितता यावरून आता संबंधित अधिकार्‍यांना नोटिसा निघू लागल्या आहेत. प्रशासनाकडून संबंधित खातेप्रमुखांना, खातेप्रमुखांकडून अन्य अधिकार्‍यांना नोटिसांचा सिलसिला सुरू झाला आहे. खुलासे मागविले आहेत. चौकशी सुरू झाली आहे. लवकरच काही विभागात अंतर्गत लेखापरीक्षण सुरू होणार आहेे. 

पंचायत राज समिती दि. 22 ते 24 नोव्हेंबररोजी सांगली दौर्‍यावर होती. दि. 22 रोजी जिल्हा परिषदेत सन 2011-12 च्या लेखापरीक्षण पुनर्विलोकन अहवालावर अधिकार्‍यांची साक्ष झाली. पंचायत राज समितीने अधिकार्‍यांची झाडाझडती केली. अपवाद वगळता अनेक अधिकार्‍यांना त्याचा सामना करावा लागला. समितीचा दौरा संपला आहे. आता समितीने दिलेल्या निर्देशांनुसार कार्यवाही सुरू आहे. 

पंचायत राज समिती दौर्‍यापूर्वी जिल्हा परिषदेत अधिकारी दोन आठवडे तयारी करत होते. ‘पीआरसी’ची रंगीत तालिम होत होती. मात्र अपूर्ण माहितीमुळे ‘पीआरसी’ने उपस्थित केलेल्या काही प्रश्‍नांना उत्तर देता आले नाही. निधी शिल्लक असताना ती माहिती का दिली नाही, असे एका अधिकार्‍यांनी दुसर्‍या अधिकार्‍यांकडून नोटीसद्वारे खुलासा मागविला आहे. 

निधी वितरण केल्यानंतर कार्यारंभ आदेश देणे, कामांचा निधी देताना विहीत कार्यपद्धती न अवलंबणे यावरूनही काही अधिकार्‍यांकडून खुलासा मागविला आहे. पंचायत राज समितीच्या साक्षवेळी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना योग्य उत्तरे न दिलेल्या अधिकार्‍यांकडूनही खुलासा मागविण्यात येत आहे.