Sat, Jan 19, 2019 20:14होमपेज › Sangli › रक्त तपासणी नव्हे, हे तर रक्तशोषण!

रक्त तपासणी नव्हे, हे तर रक्तशोषण!

Published On: Aug 29 2018 1:29AM | Last Updated: Aug 28 2018 11:53PMवाढते प्रदूषण, अन्नातील भेसळ, अन्न पिकविण्याच्या पद्धती, खाण्याच्या चुकीच्या पद्धती, बदलती जीवनशैली या सर्वांचा परिणाम हा माणसाच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे माणसे अनेक आजारांनी त्रस्त झालेले आहेत. साध्या थंडी, तापापासून ते रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह सारख्या गंभीर आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याला लहान मुलेही मोठ्याप्रमाणात बळी पडत आहेत. शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात रुग्णांची रांग लागलेली दिसते. काही आजार हे हवेतून आलेल्या जंतू संसर्गातून होतात, तर काही आजार हे दूषित पाण्यामुळे झालेले असतात. मलेरिया, हिवताप, डेंग्यू या सारखे आजार नेहमीचेच ठरलेले आहेत. यामध्ये ताप, अंगदुखीसारखी लक्षणे दिसत असतात. या आजाराचे निदान करायचे झाले तर कोणताही डॉक्टर अगोदर रक्त तपासणी करून घेत असतो. त्याच्या निदानानंतर रुग्णांवर उपचाराचा निर्णय घेतला जातो. 

रक्त तपासणीसाठी अनेक पॅथॉलॉजीस्ट आहेत. दररोज त्यांच्याकडे  तपासणीसाठी गर्दी झालेली दिसते. नेहमीच्या व अत्यावश्यक तपासण्या असल्यामुळे रुग्णांना या तपासण्या केल्याशिवाय पर्याय नसतो. अनेक पॅथॉलॉजीस्ट यांनी आपल्या नावाचा फार्म डॉक्टरांकडे ठेवलेला आहे. जीपीपासून स्पेशालिस्टपर्यंत काही डॉक्टर हे तपासणीसाठी ‘ठरलेल्या’ डायग्नोस्टिक सेंटरमध्ये रुग्णांना पाठवत असतात. या तपासण्यांचा खर्च हा रुग्णांच्या नाकीनऊ आणणारा असतो. त्यांच्यासमोर अन्य कोणताही पर्याय नसतो.  

शहरातील काही डायग्नोस्टिक सेंटर, ट्रस्टमार्फत चालवण्यात येणार्‍या तसेच शासकीय रुग्णालयातील तपासणी खर्चाचा अभ्यास केल्यास त्यांच्यापेक्षा खासगीमध्ये तब्बल तिप्पट ते चौपट दराने तपासण्या होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

काही ठराविक सेंटरमध्ये रुग्णांना पाठविल्याबद्दल ‘खास’ कमिशन मिळत असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिप्पट दरातून डॉक्टरांचे कमिशन बाजूला ठेवून महिन्याच्या महिन्याला त्यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात येते. 

अर्थात यामध्ये काही चांगले डॉक्टरही आहेत. अनावश्यक तपासणी न करता केवळ अचूक निदानावर ते रुग्णांवर उपचार करतात. त्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार होऊन त्यांचा पैसाही वाचतो. परंतु बहुसंख्य खासगी रुग्णालयातून गरज नसतानाही काही तपासण्या करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्याचा भुर्दंड मात्र सामान्य रुग्णांना सोसावा लागत असल्याचे दिसून येत आहे.