होमपेज › Sangli › नाट्यगृह नव्हे; रसिकांचे खाद्यगृह

नाट्यगृह नव्हे; रसिकांचे खाद्यगृह

Published On: May 22 2018 1:15AM | Last Updated: May 21 2018 10:59PMपुणे : केतन पळसकर

महाराष्ट्राची सांस्कृतिक पंढरी समजले जाणारे पुणे जसे सांस्कृतिक ठेव्यांसाठी आणि विविध कलांसाठी प्रसिद्ध आहे तसेच ते खाद्य संस्कृतीकरिता देखील तितकेच प्रसिद्ध आहे. याचाच मिलाप (अनपेक्षित) सध्या शहरातील नाट्यगृहात पाहायला मिळतो आहे. कारण नाट्यगृहात खाद्यपदार्थ नेण्यास मनाई असतानादेखील सर्रासपणे ते नाट्यगृहातील खुर्च्यांवर बसून फस्त केले जात आहेत.

सभागृहाच्या देखभालीच्या दृष्टीने खाद्यपदार्थ बाहेरील परिसरात खाण्याचा नियम प्रशासनाने घालून दिला आहे. मात्र, हा नियम फक्त कागदावरच उरलेला पाहायला मिळतो आहे. नाटक किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मध्यांतरात प्रेक्षक नाट्यगृहाच्या सभागृहात खाद्यपदार्थ नेतात. यामुळे आतील परिसर, आसन व्यवस्था अस्वच्छ होतात, हे वेगळे सांगायलाच नको. ही परिस्थिती महानगरपालिकेच्या जवळ-जवळ सर्वच नाट्यगृहांमध्ये पाहायला मिळते आहे. मध्यंतरी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या अस्वच्छतेचे धींदवडे सोशल नेटवर्किंग साइटवर काढले होते. त्याची दखल घेत या सुस्त प्रशासनाला जाग आली.

कलावंत दैवत मानणार्‍या याच रंगदेवतेच्या परिसरात खाद्यपदार्थ नेऊन कलेचे हे मंदिर अस्वच्छ होत आहे. त्याशिवाय, गेले काही दिवस नाट्यगृहातील नाटकांचा आनंद उंदीर देखील घेताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे रसिक प्रेक्षकांचा रस भंग होतो. या प्रकाराला प्रशासनाबरोबरच नागरिक देखील जबाबदार आहेत, हे देखील तितकेच खरे. मध्यंतरी अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात एका कार्यक्रमादरम्यान आयोजकांनी चक्क सभागृहामध्ये फटाके फोडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अशा सर्व प्रकारांवर महानगरपालिकेच्या सांस्कृतिक केंद्र प्रमुख्याने अंकुश ठेवायला हवाच. त्याबरोबरच रसिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी उपाययोजनासुद्धा करायला हव्यात.

सांस्कृतिक केंद्र प्रमुखांचा नाही वट

एक सामान्य नागरिक म्हणून ‘खाद्यपदार्थ आत नेऊन खाऊ शकू का?’ असा प्रश्‍न नाट्यगृहातील कर्मचार्‍यांना विचारला असता; त्यावर कुठलीही आडकाठी न करता त्यांनी ‘होकार’ दर्शविला. यावरून सांस्कृतिक केंद्र प्रमुखांच्या आदेशाचा कर्मचार्‍यांवर वट आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. या मानसिकतेमुळे नाट्यगृहातील खुर्च्या खराब होत असल्याचे आढळून येत आहे.