Fri, Nov 16, 2018 17:06होमपेज › Sangli › इस्लामपुरात भटक्या कुत्र्यांची दहशत

इस्लामपुरात भटक्या कुत्र्यांची दहशत

Published On: May 31 2018 1:46AM | Last Updated: May 30 2018 10:05PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

राजेबागेश्‍वर परिसरात डुकरांनी केलेल्या हल्ल्यात मुलगा जखमी झाल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. शहरातील 400 पेक्षा जास्त मोकाट डुकरांना पकडण्यात आले आहे. मात्र अजूनही भटक्या कुत्र्यांच्या झुंडीची दहशत नागरिकांच्यात आहे.

पाच दिवसापूर्वी राजेबागेश्‍वर परिसरात हृतिक राठोड याच्यावर डुकरांनी प्राणघातक हल्‍ला केला होता. या हल्ल्यानंतर नागरिकांच्यातून तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. मोकाट जनावरांच्या त्रासाबद्दल नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे दि.25 मेपासून पालिकेने डुकरे पकडण्याची मोहीम हाती घेतली. त्याचवेळी शहरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरताना दिसत आहेत. शहरातील उघड्या कचर्‍यावर तसेच कापूसखेड नाका, मटण मार्केट, पोलिस ठाणे परिसर, दूध संघ परिसर, राजेबागेश्‍वर आदी ठिकाणी कुत्र्यांच्या झुंंडीच्या झुंडी आढळून येत आहेत. झुंडीतील गलेलठ्ठ कुत्री पाहून नागरिकांना धडकी भरते आहे.  रात्रीच्यावेळी ही कुत्री आक्रमकपणे मोटारसायकलस्वार, पादचारी यांच्या अंगावर धाऊन जात आहेत. समोरून कुत्र्यांची झुंड येताच पादचार्‍यांना मार्ग बदलावा की काय, असा प्रश्‍न पडत आहे.