Sat, Jul 20, 2019 02:11होमपेज › Sangli › अस्तित्वात नसलेल्या विहिरीची नोंद रद्द

अस्तित्वात नसलेल्या विहिरीची नोंद रद्द

Published On: Jan 24 2018 1:21AM | Last Updated: Jan 23 2018 11:04PMविटा :  प्रतिनिधी    

तालुक्यातील आळसंद येथे अस्तित्वातच नसलेली विहीर कागदावर दाखवल्याने खळबळ उडाली होती. त्याविरोधात अन्यायग्रस्त कुटुंबाने महसूल भवनाच्या दारात उपोषण केले. त्यानंतर महसूल विभागाने रातोरात ती  नोंद रद्द केली. त्यामुळे मंगळवारी उपोषण मागे घेण्यात आले.

योगीराज महादेव जंगम यांच्याकडे श्री काशी विश्वेश्वर देवस्थानची वाहिवाटीची इनाम जमीन आहे. त्यापैकी एका गटामध्ये पूर्वी पासून तीन विहिरी आहेत. मात्र या गटात तहसीलदारांच्या आदेशानुसार चौथ्या विहिरीची कागदोपत्री नोंद घालण्यात आली होती.  ही चौथी विहीर नेमकी कुठे आहे ते दाखवा अन्यथा  बोगस नोंद रद्द करा अशी मागणी जंगम यांनी  केली होती. याबाबत तहसील कार्यालयात उपोषणकर्ते आणि प्रशासन यांच्यात चर्चेच्या फेर्‍या  झाल्या. परंतु निर्णय झाला नाही. त्यामुळे जंगम कुटुंबियांनी सोमवारी उपोषण सुरू केले होते. 

याबाबतचे वृत्त पुढारी वेब पोर्टलवर फ्लॅश होताच महसूल विभागात खळबळ उडाली. हालचाली सुरू झाल्या. रात्री  तहसीलदार रंजना उवरहंडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. सकाळी 11 वाजता नायब तहसीलदार एस. डी. पाटील यांनी  चौथ्या विहिरीची नोंद रद्द केल्याचे पत्र दिले. उपोषण मागे घेण्यात आले.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक , भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संग्रामसिंह माने , मंथन मेटकरी , हिंमतराव जाधव आदी उपस्थित होते . मात्र आता त्या विहिरीची बोगस  नोंद कुणाच्या सांगण्यावरून घातली आणि रातोरात रद्द केली असा सवाल अ‍ॅड. मुळीक यांनी विचारला आहे.