Thu, Jul 18, 2019 04:07होमपेज › Sangli › राष्ट्रवादीतून भाजपमध्ये कोणीही जाणार नाही

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये कोणीही जाणार नाही

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 23 2018 12:01AMसांगली : प्रतिनिधी

सांगली महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये कोणीही जाणार नाही. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबाबतचा निर्णय दोन्ही काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांनी घ्यावा. तो आम्हाला मान्य असेल. त्यांना पटले तर आघाडी होईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.  महापालिका क्षेत्रातील युवक राष्ट्रवादी बुथ कमिटीची आढावा बैठक मंगळवारी डेक्कन मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनच्या सभागृहात झाली.  जयंत पाटील, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील प्रमुख उपस्थित होते. 

सांगलीत दि. 4  व 5 रोजी भाजप राज्य कार्यकारिणी बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. त्यावेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये काही आऊटगोईंग होणार असल्याच्या चर्चेच्या प्रश्‍नावर जयंत पाटील म्हणाले, आमच्या पक्षातील कोणीही भाजपमध्ये जाणार नाही. आमचा पक्ष आणि भाजपची विचारधारा, त्यांची धोरणे यांच्यात मोठा फरक आहे. भाजपमध्ये जे जाणारे असतील ते सध्या कोणत्या पक्षात आहेत हे त्यांनाही माहित नसावे.

महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार का या प्रश्‍नावर  पाटील म्हणालेे, राज्यात समविचारी पक्षांनी एकत्र यावे ही राष्ट्रवादीची भावना आहे. सांगलीत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष व काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष या दोघांचे पटले तर आघाडी होईल. आघाडीबाबत तोडगा निघाला तर प्रदेश राष्ट्रवादीची ना नाही.  

सक्षम बुथ कमिटी राष्ट्रवादीलासक्षम करेल 

युवक राष्ट्रवादीच्या बुथ आढावा बैठकीत जयंत पाटील म्हणाले, महापालिका क्षेत्रात बुथनिहाय युवक राष्ट्रवादीची कमिटी असली पाहिजे. त्यानुसार कार्यकर्ते तयार करायचे आहेत. ही बुथ कमिटी केवळ निवडणुकीपुरती नसेल. मतदारांच्या समस्या सोडविणे, विकासाची कामे करणे यासाठीही  कमिटी कार्यरत राहील. सक्षम बुथ कमिटी राष्ट्रवादीला सक्षम बनवेल. राज्यात 91 हजार बुथ कमिट्या स्थापन होत हेत. बुथ कमिटीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना कार्यप्रवण केले जाणार आहे. 

पुण्यातील  राष्ट्रवादीच्या नगरसेविका शिल्पा भोसले यांनी बुथ कमिटीबाबत मार्गदर्शन केले. ताजुद्दीन तांबोळी, श्रीनिवास पाटील, शरद सातपुते, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष (शहर) राहूल पवार यांची भाषणे झाली. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, विनया पाठक उपस्थित होते.

महापालिकेत युवकांना संधी द्या : कोते-पाटील

संग्राम कोते-पाटील म्हणाले, राष्ट्रवादी सक्षम करायची असेल तर बुथ कमिटी सक्षम केल्याशिवाय पर्याय नाही. पक्षाची ध्येय धोरणे माहीत असलेल्या व ती जनतेपर्यंत तळमळीने पोहोचविणार्‍या कार्यकर्त्यांनाच बुथ कमिटीवर संधी द्यावी. सांगली महापालिका निवडणुकीत तरुणांना जास्तीत जास्त संख्येने उमेदवारी द्यावी.