होमपेज › Sangli › रुग्णालयातील स्टाफ तपासणी नाहीच!

रुग्णालयातील स्टाफ तपासणी नाहीच!

Published On: Mar 08 2018 1:49AM | Last Updated: Mar 07 2018 10:30PMसांगली : अभिजित बसुगडे

डायग्नोस्टिक सेंटरमधील चेंजिंग रूममध्ये छुपा कॅमेरा प्रकरणानंतर वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे विविध प्रकारच्या रुग्णालयांमधील प्रशिक्षित कर्मचार्‍यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिका क्षेत्रात असणार्‍या अशा रुग्णालये, तपासणी केंद्रांकडील प्रशिक्षित कर्मचार्‍यांबाबत वर्षातून एकदाच कागदोपत्री तपासणी केली जाते. छुपा कॅमेरा प्रकरणानंतर वैद्यकीय क्षेत्राचे वाभाडे निघाले असून डॉक्टरांच्या विश्‍वासार्हतेबाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
सोमवारी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये तपासणीसाठी गेलेल्या एका महिलेच्या सजगतेमुळे छुप्या कॅमेर्‍याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे खळबळ उडाली. या घटनेनंतर वैद्यकीय व्यवसायातील विश्‍वासार्हतेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. त्याशिवाय असे सेंटर्स आणि खासगी रुग्णालयात नेमण्यात येणारे तंत्रज्ञ (टेक्निशियन), नर्स यांच्या प्रशिक्षितपणाचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. मोठ्या शहरांतील खासगी मोठी रुग्णालये, तपासणी केंद्रे यांना परवाना देताना जिल्हा शल्य चिकित्सक प्रशिक्षित कर्मचार्‍यांची माहिती घेऊनच तो देतात. त्यानंतर मात्र नियमित तपासणीची जबाबदारी महापालिका आरोग्य अधिकार्‍यांवर असते. 

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्टनुसार 285 रुग्णालयांची नोंदणी करण्यात आली आहे. तर पीसीपीएनडीटी कायद्यानुसार 102 सोनोग्राफी, डायग्नोस्टिक सेंटर्सची नोंदणी करण्यात आली आहे. अशा सेंटर्सची दर तीन महिन्यांनी तपासणी करण्यात येते; मात्र त्यामध्ये तेथील प्रशिक्षित कर्मचार्‍यांची तपासणी करण्याची तरतूदच नाही. त्याशिवाय बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्टनुसार असलेल्या रुग्णालयांची वार्षिक तपासणी करण्यात येते. त्यामध्ये मात्र प्रशिक्षित कर्मचार्‍यांचीही तपासणी होते. मात्र ती केवळ कागदोपत्रीच होत असावी अशी शंका नुकत्याच झालेल्या प्रकारामुळे निर्माण होत आहे. 

पुरेशा प्रमाणात प्रशिक्षित तंत्रज्ञ, नर्ससह अन्य कर्मचारी मिळत नसल्याने अनेकदा अप्रशिक्षित कर्मचार्‍यांची भरती केली जाते. अशा कर्मचार्‍यांची नेमणूक करताना त्यांची पार्श्‍वभूमी तपासली जात नाही. कर्मचार्‍यांची गरज असल्याने कोणतीही शहानिशा न करता भरले जाणारे असे कर्मचारी पुढे डोकेदुखी ठरत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. मुळात शासनानेच रुग्णालये, तपासणी सेंटर्समधील प्रशिक्षित कर्मचार्‍यांची तपासणीबाबत फारशी कडक तरतूद न केल्यानेच त्यांची योग्य तपासणी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय शासकीय वैद्यकीय अधिकारी नेहमीच नियमावर बोट ठेवत असल्याने या कर्मचार्‍यांची तपासणी करणार कोण, हा प्रश्‍न आहेच. 

छुप्या कॅमेर्‍यासारखे प्रकार रोखण्यासाठी रुग्णालये, तपासणी केंद्रांतील कर्मचार्‍यांचीही तपासणी करण्याची कडक तरतूद करण्याची आवश्यकता आहे.