Thu, Jan 24, 2019 04:10होमपेज › Sangli › ‘पार्किंग’ हरविलेले इस्लामपूर शहर!

‘पार्किंग’ हरविलेले इस्लामपूर शहर!

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 17 2018 7:46PMइस्लामपूर : अशोक शिंदे

शहरातील वाहनांची संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे. शहर परिसरात गर्दीच्या-बाजारपेठांच्या ठिकाणी वर्षानुवर्षे पार्किंगसाठी कोठेही जागा नाही. त्यामुळे शहरातील मुख्य मार्ग तुडुंब गर्दीचे झाले आहेत. विकास आराखडा अद्याप न झाल्याने आणि 1980 च्या आराखड्यातील आरक्षणे विकसित न झाल्याने त्याचाही जबर फटका वाहतुकीला बसत आहे. शहरात तालुक्यातून बाजारासाठी दर गुरूवारी - रविवारी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. पूर्व प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षणाच्या  विविध शाखा येथे विस्तारत असल्याने शिक्षणाच्या निमित्ताने हजारो विद्यार्थ्यांचे वास्तव्य शहरात वाढते आहे. सधनपट्टा, राष्ट्रीय महामार्गाशी जवळीक, सहकाराचे जाळे, शिक्षणाच्या विविध शाखा अशा अनेक कारणाने शहर विस्तारत आहे. त्यामुळे वाहनांचीदेखील संख्या वेगाने वाढत आहे. 

तब्बल 80 ते 90 हजार लोकसंख्येच्या पुढे विस्तारत असलेल्या या शहरातील गांधी चौक, यल्‍लामा चौक, बसस्थानक रोड, शिराळा नाका, आणि प्रामुख्याने आचार्य जावडेकर भाजीपाला मार्केट  अशा नेहमी गजबजलेल्या ठिकाणीदेखील वाहन तळांचा अभाव आहे. या प्रश्‍नाकडे गांभिर्याने पाहिलेले नाही. बहे नाका परिसरात भरणार्‍या भाजीपाला मार्केटजवळ वाळवा बझारसह अन्य बझार, फळ-भाजी विक्रेते तसेच बाजूलाच इस्लामपूर बाजार समितीकडे येणारी वाहने यांची तुडुंब गर्दी बाजाराच्या दिवशी झालेली असते. वाहतूक पोलिसांची  इथली उपस्थिती इथली बेशिस्त रोखू शकलेले नाही. येथीलच तहसील कचेरीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या परिसरात पुन्हा तालुक्यातून वाढणार्‍या गर्दीचा विचार अद्याप वाहतूक व्यवस्थेने, पालिकेने, लोकप्रतिनिधींनी कितपत केला आहे; हा संशोधनाचा विषय आहे. राज्यात अग्रभागी आलेल्या, येऊ पाहणार्‍या या शहरात कुठेही वाहन तळाचा मुळात पत्ताच नाही. शहर विकास आराखड्यातील ‘पार्किंग’ तूर्तास हवेतच आहे.