Mon, Aug 19, 2019 00:41होमपेज › Sangli › नाईक-महाडिक गटात कलह?

नाईक-महाडिक गटात कलह?

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 24 2017 11:21PM

बुकमार्क करा

इस्लामपूर : वार्ताहर

पेठ ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार शिवाजीराव नाईक यांच्या सांगण्यावरूनच उमेदवारी अर्ज भरल्याचा गौप्यस्फोट नाईक समर्थक माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी केला आहे. त्यामुळे नाईक-महाडिक गटात कलह निर्माण झाला आहे. परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीत शिराळा मतदारसंघातील राजकारणाची समीकरणेही बदलू शकतात.

गेल्या विधानसभा निवडणुकीत नानासाहेब महाडिक गट  शिवाजीराव नाईक यांच्या पाठिशी राहिला होता. शिराळा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील ‘त्या’ 48 गावांतून नाईक यांना मताधिक्क्य देण्यासाठी महाडिक गटाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. नाईक यांच्या काठावरील विजयात 48 गावांतीलच मताधिक्क्य निर्णायक ठरले होते. 

सन 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाडिक गटाने राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांचा पराभव होऊन मानसिंगराव नाईक विजयी झाले होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नाईक-महाडिक गटात समेट झाला. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद-पंचायत समिती व नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या दोन्ही गटांनी काही गावातून एकत्रित लढल्या. 

पेठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मात्र सरपंच पदासाठी नाईक समर्थक माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी आपल्या पत्नीचा  उमेदवारी अर्ज मीनाक्षीताई महाडिक यांच्याविरोधात भरून थेट महाडिक यांनाच आव्हान दिले. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत होते. कारण पेठ मतदारसंघातून प्रकाश पाटील यांना निवडून आणण्यात महाडिक यांनीही प्रयत्न केले होते. 

माजी जि.प. सदस्य सम्राट महाडिक व प्रकाश पाटील यांनी एकत्रित काम करूनही ते महाडिक यांच्याविरोधात निवडणुकीत उभे राहिले. आता प्रकाश पाटील यांनीच आ. नाईक यांच्या सांगण्यानुसारच निवडणूक लढविल्याचा खुलासा  करून सर्वांनाच धक्‍का दिला आहे. 

शिराळा मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत सम्राट महाडिक हेही इच्छुक होते. मात्र शेवटच्या क्षणी नाईक-महाडिक गटात समेट होऊन महाडिक गटाने शिवाजीराव नाईक यांना पाठिंबा दिला. आता नाईक यांनीच महाडिक गटावर कुरघोडी केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत महाडिक गट कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण सम्राट महाडिक यांनी विधानसभेच्या तयारीसाठी शिराळा मतदारसंघात युवकांचे चांगले संघटन केले आहे. ते ती निवडणूक लढविणार काय?, महाडिक-नाईक संघर्ष पेटणार काय? याकडे आता मतदारसंघातील जनतेचे लक्ष आहे.