Sun, May 26, 2019 10:44होमपेज › Sangli › व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुढील सुनावणी

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुढील सुनावणी

Published On: Jan 02 2018 1:13AM | Last Updated: Jan 02 2018 12:10AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खूनप्रकरणातील संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह साथीदारांबाबत येथील न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यांच्याबाबतची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घ्यावी अशी मागणी पोलिस प्रशासनाने अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली होती. त्यावर आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. खापे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यास मंजुरी दिली. दरम्यान कामटेसह सर्व संशयितांना 14 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेशही दिले. 

प्रत्येक सुनावणीवेळी संशयितांना कळंबा कारागृहातून सांगलीत आणावे लागते. त्यामुळे पोलिस प्रशासनावर ताण पडत आहे. त्याशिवाय हे प्रकरण संवेदनशील असल्याने याप्रकरणाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात यावी असे पत्र पोलिस प्रशासनाने प्रधान जिल्हा न्यायाधिशांना पाठविले होते. त्यावर आज सुनावणी घेण्यात आली. पोलिसांचा अर्ज मंजूर करण्यात आला. 

याप्रकरणातील संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांना सध्या कळंबा येथील कारागृहात ठेवण्यात आले आहे. दर पंधरा दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर सुनावणी घेण्यात येते. त्यावेळी संशयितांना सांगलीतील न्यायालयात हजर करावे लागते. त्यांना कळंबा कारागृहातून सांगलीत आणून परत सोडण्यासाठी पोलिस प्रशासनाला अतिरिक्त मनुष्यबळ वापरावे लागत आहे. त्याशिवाय हे प्रकरण संवेदनशील असल्याने तसेच कळंबा ते सांगली अंतरही अधिक असल्याने पोलिसांवर त्याचा ताण पडत आहे. 

याबरोबरच कामटेसह संशियतांचा नातेवाईकांना भेटण्याचा प्रयत्न नेहमीच सुरू असतो. दि. 19 रोजी झालेल्या सुनावणीनंतर कोल्हापूरला जात असताना त्याचा नातेवाईकांना भेटण्याचा प्रयत्न फसला होता. त्याबाबत दैनिक पुढारीने वृत्त दिले होते. पोलिसांवर पडणारा ताण तसेच पुढारीने केलेली पोलखोल यामुळे पोलिस प्रशासनाने आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यासाठी प्रधान जिल्हा न्यायाधिशांना पत्र देण्यात आले होते.