Sun, Jul 21, 2019 12:01होमपेज › Sangli › समडोळी कचरा डेपोकडे महापालिकेचे दुर्लक्ष 

समडोळी कचरा डेपोकडे महापालिकेचे दुर्लक्ष 

Published On: Jun 15 2018 1:07AM | Last Updated: Jun 14 2018 8:28PMकवठेपिरान : वार्ताहर

सांगली - कवठेपिरान रस्त्यावर महानगरपालिकेचा कचरा डेपो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा डेपो चर्चेत आला आहे. महापालिकेने हा प्रश्न आजपर्यंत प्रलंबित ठेवला आहे. फक्त आश्वासनांची खैरात केली. आजही या भागातील नागरिकांना याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या डेपोच्या व्यवस्थापनासाठी  अनेकवेळा अंदोलने झाली. प्रत्येक वेळी मलमपट्टी करून पालिका रिकामी होते. पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’.. प्रमाणे काम सुरू होते. 

डिसेंबर महिन्यात पुन्हा या भागातील लोकप्रतिनिधींनी एकत्रित येेऊन डेपोत येणार्‍या कचर्‍याच्या गाड्या अडविल्या होत्या. त्यावेळी महापौर हारुण शिकलगार, आयुक्त रविंद्र खेबुडकर, उपआयुक्त सुनील पवार यांनी या डेपोमध्ये लवकरच सेग्रीगेटर मशीन बसवू तसेच हा डेपो बंदिस्त करुन या ठिकाणी झाडे लावून बगिच्याही निर्माण करू, असे आश्‍वासन दिले होते. पण सध्या ते फक्त  आश्‍वानच ठरले आहे.
या आश्‍वासनाला आता सहा महिने होत आले आहेत. तरीही अद्याप डेपो बंदिस्त झालेला नाही आणिसेग्रीगेटर मशीन आलेले नाही. त्यामुळे ठेकेदार अधिकार्‍यांचे  ऐकत नाहीत की, अधिकार्‍यांचा वचक राहिला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.या सगळ्या प्रकरणाला कंटाळलेले या भागातील ग्रामस्थ आता हा डेपो कायमस्वरूपी हटविण्यासाठी  जनआंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यामुळे  महापालिका प्रशासनाने  जर या गोष्टीकडे कानाडोळा केला तर येणार्‍या काही दिवसातच लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.