Sun, Jul 21, 2019 02:14होमपेज › Sangli › सलगरेत रेल्वे पुलाजवळ ठिय्या आंदोलन

सलगरेत रेल्वे पुलाजवळ ठिय्या आंदोलन

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 11:08PM

बुकमार्क करा

लिंगनूर : वार्ताहर

सलगरेतील रेल्वे पुलाच्या पर्यायी रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल नागरिकांनी  सोमवारी  सकाळी तीन तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनावेळी काम बंद ठेवण्यात आले. यावेळी अधिकारी आणि ग्रामपंचायत सरपंच तानाजी पाटील उपसरपंच सुरेश कोळेकर यांच्यात काहीकाळ वाद झाला. त्यानंतर झालेल्या चर्चेनुसार पर्यायी रस्ता भक्‍कम करून दुचाकीकरिता बाजूने लहान रस्ता करण्याचा मार्ग काढण्यात आला. ही मागणी अधिकारी आणि कंत्राटदार यांनी मान्य केल्यानंतर दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले.

सलगरेत रेल्वे पुलाखालून भुयारी पूल करण्यासाठी खोदकाम सुरू आहे. त्यापूर्वी ग्रामपंचायत अथवा स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे अनेक वाहने अडकली. अनेकदा वाहतूक खोळंबली. दुचाकींचे अपघात झाले. बसेस गावात यायच्या बंद झाल्या. दूध, अवजड वाहतूक अत्यंत दूरवरून करावी लागली. तक्रार केल्यानंतर अधिकार्‍याकडून कारवाईची धमकी दिली जात असल्याने अखेर सोमवारी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. 

दरम्यान, चर्चेवेळी सर्व वाहनांना सुरक्षित जाता येईल असा दुपदरी भक्‍कम रस्ता तयार करणे, योग्य ठिकाणी रस्ते पक्के करणे, दुचाकी करिता जवळचा रस्ता बनविणे अशा मागण्या मान्य करण्यात आल्या. दोन दिवसांत चर्चेत ठरल्याप्रमाणे काम पूर्ण करून दिले जाईल असे आश्‍वासन अभियंता रवींद्र सिंग, अभियंता प्रद्युम्न चव्हाण, मिरजचे अभियंता पी जी जोशी, कंत्राटदार प्रतिनिधी, जयप्रकाश यांनी दिले.