Thu, Apr 25, 2019 07:30होमपेज › Sangli › युवक काँगे्रसचे माजी अध्यक्ष नजीर वलांडकर यांचे अपघाती निधन

युवक काँगे्रसचे माजी अध्यक्ष नजीर वलांडकर यांचे अपघाती निधन

Published On: Jan 24 2018 1:21AM | Last Updated: Jan 23 2018 11:33PMवाळवा : प्रतिनिधी

वाळवा तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष व वाळवा ग्रामपंचायतीचे सदस्य नजीर बालेचांद  वलांडकर यांचे मंगळवारी अपघाती निधन झाले. गेले आठ दिवस त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. 

दि. 16 जानेवारी रोजी रात्री इस्लामपूर-कामेरी मार्गावर दत्त टेकडीजवळील वळणावर त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. कुंडलवाडी येथील कार्यक्रम संपवून ते घरी चालले होते. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरुवातीला तीन दिवस ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाच मंगळवारी सकाळी 8 वाजता त्यांचे निधन झाले. 

रुग्णालयात काही काळ गोंधळ

नजीर वलांडकर यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे सुरुवातीला समजले होते; पण त्यांच्या पोटामध्ये अंतर्गत दुखापत झाल्याचे तपासणीनंतर पुढे आले. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. नातेवाईकांकडून उपचारात हलगर्जीचा आरोप करण्यात आल्याने किरकोळ वादही झाला. राजारामपुरी पोलिसांनी दवाखान्यात येऊन नातेवाईकांची समजूत घातली. अखेर सीपीआरमध्ये मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. तसेच मृतदेहाचे फोटोही पंचनाम्यासाठी घेण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल मिळाल्यानंतर याबाबत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. 

महाडीक यांचे समर्थक असलेले नजीर वलांडकर यांनी वनश्री नानासाहेब महाडीक क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष, महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. त्यांनी नुकतीच पंचायत समितीची निवडणूकही लढविली होती. ते वाळवा ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणूनही काम करीत होते. 

हुतात्मा संकुलामध्येही ते अलिकडच्या काळात सक्रीय झाले होते. वक्‍तृत्व व धडाडीचे राजकीय कौशल्य यामुळे त्यांचा मित्र परिवार मोठा होता. त्यांच्या निधनाने वाळवा गाव बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गावातून अंत्ययात्रा काढून सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.