होमपेज › Sangli › सांगलीच्या नवनाथ गोरे यांच्या फेसाटी कांदबरीला साहित्य अकादमी पुरस्‍कार

सांगलीच्या नवनाथ गोरे यांच्या फेसाटी कांदबरीला साहित्य अकादमी पुरस्‍कार

Published On: Jun 22 2018 3:24PM | Last Updated: Jun 22 2018 3:40PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजाला जाणारा साहित्य अकादमीचा यावर्षीचा युवा साहित्य पुरस्‍कार कांदबरीकार नवनाथ गोरे यांना प्राप्‍त झाला आहे. फेसाटी कांदबरीला हा पुरस्‍कार जाहीर झाला आहे. नवनाथ गोरे हे मुळचे सांगली जिल्‍ह्यातील असून उमदी (जत तालुका) येथील आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीतील उमदी येथे झाले असून एमए मराठी शिवाजी विद्यापीठातून केले आहे. 

या आधी नवनाथ गोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, लातूर, वर्धा येथील बाबा पद्मनजी प्रदीपराव दाते पुरस्‍कार असे एकूळ दहा पुरस्‍कार त्यांना मिळाले आहेत. 

साहित्य अकादमीचा पुरस्‍कार मिळाल्यानंतर पुढारी ऑनलाईनला गोरे यांनी प्रतिक्रिया देताना म्‍हणाले की, साहित्य अकादमीसारख्या राष्ट्रीय पातळीवरील संस्‍थेने फेसाटी कांदबरीची दखल घेतल्याने मनस्‍वी आनंद झाला आहे. यानिमित्ताने खेड्यापाड्यातील, दुष्काळी भागाचे आणि शेतकरी वर्गाचे जीवन साहित्यातून मांडता आले. त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतल्याने आणखी प्रोत्‍साहन मिळाले आहे.

मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांनी नवनाथ गोरे यांच्या कादंबरीविषयी बोलताना सांगितले की, चार वर्षांपूर्वी अवर्षणग्रस्त जत तालुक्यातील एका छोट्या गावातून मजुरी करणाऱ्या कुटूंबातून नवनाथ गोरे नावाचा एक मुलगा एमए, करण्यासाठी शिवाजी विद्यापीठात आला. विष्णू पावले या लिहिणाऱ्या मित्रामुळे आपणही आपले जग लिहावे असे त्याला वाटू लागले. सुरुवातीला त्याने काही कथा लिहिल्या, पण पुढे त्याला मोठी गोष्ट कादंबरी लिहावी वाटू लागली. त्याने ती लिहिलीही. या त्याच्या लेखनशैलीने कादंबरीतील लाईव्ह गोष्टीवेल्हाळ आणि वेधक कथानाने मी भारावून गेलो आहे. मराठी साहित्यक्षेत्राबरोबरच इतर भाषेतील साहित्यातही फेसाटीसारख्या कांदबरीतील नवीन विषय आला आहे हे साहित्याच्या दृष्टीने महत्‍वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.