Thu, May 23, 2019 20:24
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › नाट्य परिषद निवडणूक; ७२ टक्के मतदान

नाट्य परिषद निवडणूक; ७२ टक्के मतदान

Published On: Mar 05 2018 1:44AM | Last Updated: Mar 04 2018 11:47PMसांगली : प्रतिनिधी 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सांगली-सातारा विभागासाठी 72.89 टक्के मतदान झाले. पहिल्यांदाच जाहीरपणे झालेल्या निवडणुकीत सदस्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.  सांगली - सातारा विभागाच्या तीन जागांसाठी  सहा उमेदवार  रिंगणात होते. प्रत्यक्ष  मतमोजणी आज  करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष निकाल मात्र 7 मार्चरोजी जाहीर होणार आहे. विशेष म्हणजे इस्लामपूर  शाखेतून माजी मंत्री आमदार जयंत पाटील, सांगलीत मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप  पाटील, तसेच स्थानिक सदस्यांनी मतदानाचा हक्‍क बजावला. 

नाट्य परिषदेचे अभिनेते मोहन जोशी हे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये  बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पंचवार्षिक निवडणूक पोस्टल मतदानाद्वारे होत होती. प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडणूक घेण्यासाठी परिषदेच्या घटनेत दुरुस्ती करून ती मंजूर करून घेतली. राज्यातील परिषदेच्या विविध शाखांद्वारे 60 प्रतिनिधी निवडून द्यावयाचे आहेत. त्यातील 30 प्रतिनिधींची निवड बिनविरोध झाली आहे. उर्वरित 30 जागेमध्ये मुंबईत 10 जागेसाठी व उर्वरित महाराष्ट्रात 20 जागेसाठी रविवारी मतदान झाले. 

सांगली, सातारा विभागाच्या तीन जागेसाठी मतदान झाले. मोहन जोशी पॅनेलकडून श्रीनिवास जरंडीकर, मकुंद पटवर्धन, संदीप पाटील (इस्लामपूर) हे उभे होते. तर चंद्रकांत धामणीकर (सांगली), धनंजय जोशी (मिरज) व संजय रुपलग (मिरज) हे स्वतंत्ररित्या निवडणूक लढवित होते. या विभागातील 1177 सदस्यांपैकी 858 सदस्यांनी मतदानाचा हक्‍क बजावला. यात सांगली शाखा 274, मिरज - 85, चिंतामणीनगर शाखा - 51, विटा - 173, इस्लामपूर - 106, कर्‍हाड - 18, सातारा - 101, महाबळेश्‍वर - 50 आदी सदस्यांनी मतदानाचा हक्‍क बजावला. सांगली येथील भावे नाट्यमंदिराच्या नाट्य परिषदेच्या कार्यालयात मतदानाची प्रक्रिया पार पडली. यावेळी डॉ. अनिल मडके, शफी  नायकवडी, शरद मगदूम, संमोहन तज्ज्ञ अजितकुमार आदींसह नाट्य क्षेत्रातील अनेक सदस्यांनी हक्‍क बजावला. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.