Fri, Jul 19, 2019 00:52होमपेज › Sangli › राष्ट्रीयीकृत बँकांची आयुक्‍तांनी घेतली गंभीर दखल

राष्ट्रीयीकृत बँकांची आयुक्‍तांनी घेतली गंभीर दखल

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 04 2018 11:13PMसांगली : प्रतिनिधी

खरीप हंगामात पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्जवाटप  कमी आहे. त्याची गंभीर दखल घेतली आहे. या बँकांबाबत कारवाईचा कानमंत्र जिल्हाधिकारी यांना दिला आहे. या बँकांच्या विभागीय प्रमुखांची पुणे येथे लवकरच बैठक घेतली जाणार आहे. कामकाज कसे करून घ्यायचे ते पाहू. रिझल्ट दाखवून देऊ, असा पवित्रा पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केला.  डॉ. म्हैसेकर यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेत आयुक्त कार्यालयाकडून झालेल्या वार्षिक तपापसणीवर ‘मेमोरिडींग’ घेतले. जिल्हा परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे उपस्थित होते. 

राष्ट्रीयीकृत बँकांबाबत रिझल्ट दाखवू

डॉ. म्हैसेकर म्हणाले, जिल्हा बँकेने खरीप पीक कर्जाचे 65 टक्के ‘टार्गेट’ गाठले आहे. जिल्हा बँकेचे काम चांगले आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांनी उद्दीष्टाच्या 11 ते 35 टक्क्यांपर्यंत कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी कमी कर्जवाटप केले आहे.जिल्हाधिकारी यांच्याकडून सारे तपशील घेतले आहेत. या बँकांच्या विभागीय प्रमुखांची लवकरच पुणे आयुक्त कार्यालयात बैठक बोलविली जाणार आहे. कमी कर्ज वाटपाची कारणे घेतली जातील.कामकाज कसे करून घ्यायचे हे दाखवून देऊ. बँकांबाबत ‘रिझल्ट’ दिसेल. जिल्ह्यात सुमारे 1 लाख 17 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे. लाभार्थी 48 हजार शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी फ्रेश पीक कर्जवाटप झाले आहे, अशी माहितीही म्हैसेकर यांनी दिली. 

7/12, फेरफार मिळत नसल्यास तहसीलदारांकडे तक्रार करा

ऑनलाईन सात/बारा उतारा, फेरफार उपलब्ध होत नसल्याने शेतकर्‍यांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याकडे लक्ष वेधले असता म्हैसेकर म्हणाले, सात/बारा उतारे, फेरफार दाखले शेतकर्‍यांना देण्यात तलाठी हयगय करत असल्यास तहसिलदार अथवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. दाखल्यांअभावी एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही. 

जिल्ह्यात नवीन 57 सजे

जिल्ह्यात 57 नवीन तलाठी सजे तयार केले जात आहेत, अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली. दरम्यान महसूल तसेच जिल्हा परिषदेकडील रिक्त पदांवर भरतीचा विषय हा शासनस्तरावरील आहे. भरतीबाबत राज्य शासन निर्णय घेईल. दरम्यान पशुधन विकास अधिकारी अथवा तत्सम अधिकार्‍यांना स्थानिक गरज पाहून नेमणुकीचे ठिकाण देण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार देण्यासंदर्भात निर्णय होईल, असेही म्हैसेकर यांनी सांगितले. 

जिल्ह्यात वाळू लिलावाचे 131 प्रस्ताव आहेत. वाळूचे लिलाव काढता येथील. वाळूबाबत जे जे काही करता येईल ते ते केले जाईल, असे म्हैसेकर यांनी सांगितले. दरम्यान यांत्रिकी बोटीने वाळू उपसाला 
मज्जाव असल्याने परिणाकारक वाळू उपलब्ध होत नसल्याच्या प्रश्‍नावर त्यांनी हरित लवादाच्या निवाड्याकडे लक्ष वेधत बोलण्यास नकार दिला. 

15 ऑगस्ट ‘डेडलाईन’

सांगली जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेचे कामकाज चांगले आहे. मात्र सुधारण्यास वावहीव असतो. तो आहे. प्रधानमंत्री आवास योजना, संपूर्ण स्वच्छता अभियान व अन्य महत्वाकांक्षी कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणांना दि. 15 ऑगस्ट डेडलाईन दिली आहे, अशी माहितीही डॉ. म्हैसेकर यांनी दिली. 

सांगली-कोल्हापूर-सातारा टुरिस्ट सर्किट’

डॉ. म्हैसेकर म्हणाले, सांगली-कोल्हापूर-सातारा टुरिस्ट सर्कीट डेव्हलप केले जाईल. या जिल्ह्यांमध्ये पर्यटन विकासाची मोठी क्षमता आहे. त्यादृष्टीने विकास केला जाईल. 

10 बँकांकडून कमी पीक कर्ज वाटप; ठेवी काढणार

जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट 1100 कोटी रूपये आहे. मात्र आत्तापर्यंत 350 कोटी रूपये कर्ज झाले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचे पीक कर्ज वाटप कमी आहे. कमी कर्ज वाटप केलेल्या 10 बँकांवर कारवाईचे संकेत मिळत आहेत. शेतकर्‍यांना कर्ज न देणार्‍या बँकांकडील ठेवी काढून घेण्याबाबत आयुक्तांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले असल्याचे समजते. 

पावसाची उघडीप, आर्द्रतेचा डाटा नोंद होणार

डॉ.  म्हैसेकर म्हणाले, जिल्ह्यात पावसाची सरासरी चांगली आहे. 106 टक्के पाऊस नोंद झाला आहे. पण एक/दोन दिवसात धो-धो पाऊस पडतो आणि सरासरी वाढते.  मध्यंतरी पावसाने मोठी उघडीप घेतली. त्यामुळे खरीप पेरणीचा प्रश्‍न निर्माण झाला. पावसाची उघडीप (ड्राय स्पेल), जमिनीतील आर्द्रता याबाबतच्या नोंदी घेण्यास जिल्हाधिकारी यांना सांगितले आहे. नजिकच्या भविष्यात गरज पडली तर त्याचा उपयोग करता येईल. शेतकर्‍यांना दिलासा देता येईल.