Mon, Aug 19, 2019 18:42होमपेज › Sangli › पोलिसांचा वापर ही राष्ट्रवादीची परंपरा; भाजपची नव्हे

पोलिसांचा वापर ही राष्ट्रवादीची परंपरा; भाजपची नव्हे

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 11:30PMसांगली : प्रतिनिधी

पोलिसांचा वापर आणि दडपशाही करून निवडणुका जिंकणे ही काँग्रेस-राष्ट्रवादीची परंपरा आहे.  आतापर्यंत ते हेच करीत आले आहेत. भाजप असले गलिच्छ राजकारण करीत नाही, असा टोला भाजप नेते जलसंधारण राज्यमंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना पत्रकार बैठकीत लागवला. भाजपच्या झंझावातापुढे त्यांना महापालिका निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने असे आरोप करीत असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीने 20 वर्षांत  शहरांचे वाटोळे केले, असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सभेत भाजप पोलिसांकरवी दडपशाही करून निवडणूक जिंकू पाहत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला होता.  श्री. शिंदे  म्हणाले, गृहमंत्रीपद वर्षानुवर्षे राष्ट्रवादीकडेच होते. त्यांनीच ही  परंपरा जोपासली होती.  त्यामुळे  त्यांना ध्यानी-मनी सर्वांचा कारभार तसाच दिसतो आहे.ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला. पण महापालिकेतील काँग्रेस व राष्ट्रवादीने विकास कामात अडथळे आणले. अमृत योजनेची निविदा काढली, पण ते काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामागे नेमके कोण आहे, याचे उत्तर आधी जनतेला द्यावे. 

प्रा. शिंदे म्हणाले, भाजप विकासकामांवरच गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. आता महापालिका निवडणुकीतही भाजपच्या झंझावातामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिकेची निवडणूक एकत्र येऊन लढण्याची वेळ  आली आहे. ते म्हणाले, भाजपवर टीका करण्याऐवजी येथील महापालिकेत दोन्ही काँग्रेसने सांगलीत काय दिवे लावले, याचा हिशेब जनतेला द्यावा.प्रा. शिंदे  म्हणाले, भाजपची सत्ता येताच गुंठेवारी भागाचा विकास, स्मार्ट सिटीत शहराचा समावेश करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. गेल्या 20 वर्षात सांगलीचा विकास झालेला नाही. बगलबच्यांच्या जागा वाचविण्यासाठी दुसर्‍याच्या जागेवर आरक्षणे टाकली गेली. या सार्‍या गोष्टींची पुन्हा पडताळणी केली जाईल. 

आरक्षणाबाबत सकारात्मक

मराठा, धनगर, लिंगायत, कोळी समाजाच्या आरक्षणाबाबत शासन सकारात्मक आहे. काही गोष्टीत न्यायालयाची स्थगिती आहे, तर काही ठिकाणी घटनात्मक पेच आहे. त्यातूनही मुख्यमंत्र्यांकडून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

शिवसेनेची गरज भासणार नाही

एका प्रश्नावर प्रा. शिंदे म्हणाले, विधानसभेवेळी सेना-भाजप दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. नंतर आमची युती झाली. सांगलीत शिवसेना व भाजप स्वतंत्ररित्या लढत आहेत. महापालिकेत सत्तेसाठी आम्हाला शिवसेनेची गरज भासणार नाही. भाजप बहुमताने सत्तेवर येईल.