Fri, Jul 19, 2019 13:25होमपेज › Sangli › न.पा. पोटनिवडणुकीमध्ये तासगावात राष्ट्रवादीची बाजी

न.पा. पोटनिवडणुकीमध्ये तासगावात राष्ट्रवादीची बाजी

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 13 2018 12:08AMतासगाव : शहर प्रतिनिधी

येथील नगरपालिका प्रभाग क्रमांक 6 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या सादिया हारुन शेख या 180 मतांनी विजयी झाल्या.  भाजप पुरस्कृत उमेदवार तायरा कादर मुजावर यांना पराभव स्वीकारावा लागला. शेख यांना 930 आणि मुजावर यांना 750 मते मिळाली. ‘नोटा’ला 22 मते मिळाली. या निकालाने तासगावमध्ये भाजपला पुन्हा एकदा धक्‍का बसला आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेहाना मुल्ला यांचे पद जातपडताळणी दाखल्याच्या कारणावरून रद्द झाले होते. त्यामुळे ही  पोटनिवडणूक झाली होती. दरम्यान, दि. 2 एप्रिल रोजी या निवडणुकीच्या प्रचारावरून तासगावात राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली होती. त्यावेळी पोलिसांनाही मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणात 136 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.  तेंव्हापासून शहरात तणावपूर्ण वातावरण होते. 

या सर्व पार्श्वभूमीवर निवडणुकीत यश कोणाला मिळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. गुरूवारी सकाळी  येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या हॉलमध्ये मतमोजणीस सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शंकरराव भोसले,  मुख्याधिकारी अभिजीत वायकोस, पोलिस उपअधीक्षक अशोक बनकर, तहसीलदार सुधाकर भोसले उपस्थित होते. 

दरम्यान  मतमोजणी केंद्रावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र दोन्ही गटांच्या मोजक्या  कार्यकर्त्यांनीच तहसील कार्यालयाच्या आवारात हजेरी लावली.  जमावबंदी असल्याने कोणत्याही प्रकारचा जल्लोष झाला नाही. चिंचणी नाका येथे  मात्र फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

Tags : sangli news, Nagarpalika,  by-election, Nationalist Congress, won,