होमपेज › Sangli › राष्ट्रवादी, भाजपसह अपक्षांचे 100 अर्ज अपात्र

राष्ट्रवादी, भाजपसह अपक्षांचे 100 अर्ज अपात्र

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 13 2018 12:01AMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची गुरुवारी (दि. 12) सहा निवडणूक केंद्रांमध्ये छाननी झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या प्रभाग 18 मधील उमेदवार ज्योती आदाटे, भाजपचे सूरज चोपडे यांच्यासह अपक्ष अशा 100 हून अधिक जणांचे अर्ज विविध कारणांनी अपात्र ठरले. यामुळे अनेक इच्छुकांना दणका बसला आहे. आता  800 पेक्षा अधिक जण रिंगणात कायम राहिले आहेत. यामुळे बंडखोरीची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. 

महापौर हारुण शिकलगार, नगरसेवक युवराज बावडेकर, युवा नेते मंगेश चव्हाण, संगीता खोत, सुब्राव मद्रासी, गणेश माळी यांच्यासह अनेक जणांच्या अर्जांबद्दलही हरकती आल्या. यापैकी अनेकांच्या हरकती फेटाळून अर्ज पात्र ठरविण्यात आले, तर काही जणांचे निकाल शुक्रवारपर्यंत राखून ठेवण्यात आले आहेत.   विभागीय कार्यालय एक कडे 194 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 186 अर्जहरकतीकडे तीनही शहरांचे लक्ष होते. या सुनावणीच्या वेळी  दोन्ही पक्षांचे समर्थकही महापालिकेसमोर सकाळी 10 वाजल्यापासून मोठ्या संख्येने जमा झाले होते. दुपारी अडीचच्या सुमारास सुनावणी सुरू झाली. बावा यांनी श्री. शिकलगार यांना 2008 मध्ये तिसरे अपत्य झाल्याची हरकत घेतली. याबाबत वसंतदादा शासकीय रुग्णालयाकडून त्यांच्या नावे मुलीचा जन्म झाल्याची महापालिकेकडे नोंद झाल्याचा दावा करीत कागदपत्रे सादर केली. 

महापालिकेत मुलीऐवजी मुलगा अशी नोंद जन्म-मृत्यू कार्यालयात झाल्याचे लक्षात आल्यानंतर 2009 मध्ये त्यामध्ये दुरुस्ती करून मुलगी असे करण्यात आल्याचा दावाही बावा यांनी केला. सन 2017 मध्ये हे प्रकरण अंगलट येत असल्याने श्री. शिकलगार यांनी महापौरपदाच्या अधिकाराचा गैरवापर करीत नोंदीत दुरुस्ती करून आपले नाव खाडाखोड करून काढल्याचाही आरोप  केला. यामुळे त्यांचा अर्ज अपात्र ठरवावा, अशी मागणी  बावा यांनी केली.श्री. शिकलगार यांच्याबाजूने अ‍ॅड. राजू नरवाडकर आणि अ‍ॅड. मुमताज जमादार यांनी बाजू मांडली. त्यांनी शिकलगार यांच्याबाबतचे आक्षेप फेटाळून लावले.

बावा यांनी दिलेले पुरावे खोटे असल्याचा दावा केला. ज्या अपत्याबाबत बावा यांनी दावा केला आहे त्याच्याशी आणि संबंधित महिलेशी शिकलगार यांचा काहीच संबंध नसल्याचा दावा करीत त्याचे पुरावे सादर केले. यामध्ये संबंधित महिलेने चुकीचे नाव नोंदविल्याबद्दल प्रतिज्ञापत्राद्वारे महापालिकेतील जन्म-मृत्यू कार्यालयाकडे तक्रार केल्याचे पुरावे सादर केले. त्यानुसार नोंदीत  दुरुस्ती झाल्याची बाजू मांडली. यामुळे या प्रकरणात श्री. शिकलगार यांचा  संबंध काय, असाही प्रश्‍न केला.

सुनावणीच्या वेळी दोन्ही बाजूंनी  उलट-सुलट आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.  श्री. ठोंबरे यांनी साडेसहापर्यंत निकाल राखून ठेवला.  निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी, कायदेशीर सल्लागार यांच्याकडून अभिप्राय मागवून घेतला. त्यानुसार श्री. बावा यांचा अर्ज त्यांनी फेटाळला आणि शिकलगार यांचा अर्ज पात्र ठरविला.  बावा म्हणाले, निवडणूक अधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.या सुनावणीदरम्यान कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुनावणीदरम्यान, नगरसेवक राजेश नाईक, मयूरशेठ पाटील, उमर गवंडी, इरफान शिकलगार यांच्यासह दोन्ही बाजूंचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यांच्या अर्जांवर आज फैसला

मिरजेत दाखल झालेल्या हरकतींबाबत निवडणूक अधिकार्‍यांनी सुनावणी घेतली. परंतु, यामध्ये अभिप्राय आणि पडताळणीसाठी शुक्रवारी निर्णय होणार आहे. यामध्ये  भाजपचे विवेक कांबळे, संगीता खोत, गणेश माळी यांचा समावेश आहे. यापैकी कांबळे यांची घराच्या अतिक्रमणाबद्दल तक्रार आहे, तर गणेश माळी यांचा ठेकेदारीबद्दल आक्षेप आहे.  त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे.

कायदेशीर पूर्ण छाननीनंतरच निकाल : ठोंबरे

निवडणूक अधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले, श्री. शिकलगार यांच्या उमेदवारीबाबत श्री. बावा यांनी तिसर्‍या अपत्याच्या कारणास्तव हरकत घेतली होती. त्याबाबतच्या दोन्ही बाजू आणि पुरावे तपासण्यात आले.  कायदपत्रांची कायदेशीररित्या पडताळणीही करण्यात आली. त्यानुसारच श्री. शिकलगार यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला आहे. यासंदर्भात जर संबंधित तक्रारदारांना अपिल करावयाचे झाल्यास निवडणूक प्रक्रिया पार पडून निकालानंतरच हरकत घेण्याची तरतूद आहे.  त्यामुळे शिकलगार यांचा अर्ज आणि उमेदवारी कायम राहणार आहे.