Wed, Apr 24, 2019 07:33होमपेज › Sangli › अण्णासाहेबांच्या महामंडळात दलाली चालणार नाही

अण्णासाहेबांच्या महामंडळात दलाली चालणार नाही

Published On: Sep 11 2018 1:41AM | Last Updated: Sep 10 2018 11:53PMसांगली : प्रतिनिधी

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या काळात आर्थिक महामंडळात कर्ज देताना अनेक चुकीचे प्रकार घडले. टक्केवारी दिल्याशिवाय प्रकरणे मंजूर झाली नाहीत. यापुढे  कर्ज मंजूर करण्यासाठी टक्केवारी किंवा दलाली चालणार नाही, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान कर्ज प्रकरणास टाळणार्‍या बँकांची जिल्हाधिकार्‍यांनी बैठक घ्यावी. प्रसंगी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशाही सूचना   त्यांनी दिल्या. 

महामंडळाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी विजयकुमार  काळम पाटील, महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार  त्रिगुण कुलकर्णी, ,जिल्हा सन्मयक सर्जेराव पाटील,बँकेचे अधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्ष पाटील म्हणाले, मराठा समाजातील उद्योग करू इच्छिणार्‍या, व्यवसायासाठी प्रयत्नशील तरूणांना महामंडळाच्या माध्यमातून कर्ज मंजूर व्हावे यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. तरीही काही बँकाकडून कर्ज प्रकरणे मंजुरीबाबत सकारात्मक प्रतिसाद येत नाही. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून कर्ज देण्यास सांगा.

 या महामंडळात कधीही दलाल नव्हते.  कर्जप्रकरण मंजुरीसाठी टक्केवारी मागत असल्याचे प्रकार समोर आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.  महामंडळात अफरातफर, बोगसगिरी होणार नाही. आघाडी सरकारच्या काळात  महामंडळाला उर्जितावस्था देण्यात आली असतीतर मराठा समाजावर आरक्षण मागण्याची वेळच आली नसती. त्या सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका मराठा समाजाला बसत आहे.  ते म्हणाले,   महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येणार्या कर्जाच्या परताव्याबाबत  शासन स्वत: हमी घेणार आहे. आठवड्याभरात कर्ज हमीबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल.