Thu, Apr 25, 2019 07:25होमपेज › Sangli › नरेंद्र पाटील यांचा राष्ट्रवादीला रामराम

नरेंद्र पाटील यांचा राष्ट्रवादीला रामराम

Published On: Sep 05 2018 2:14AM | Last Updated: Sep 04 2018 10:47PMढेबेवाडी ः प्रतिनिधी 

माथाडींचे नेते व विधान परिषदेचे माजी सदस्य नरेंद्र पाटील यांनी मंगळवार दि. 4 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम केला. त्यामुळे लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या या निर्णयाने मुंबईसह पाटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच हादरा बसण्याची चिन्हे आहेत.

स्व. आण्णासाहेब पाटील यांची धडाडी ओळखून या मराठा नेत्याला प्रथम पासूनच शरद पवार, वसंतदादा यांच्या सारख्या राजकीय नेत्यांनी सहकार्य केले. माथाडी कामगार संघटनेला राजकीय ताकद देण्याबरोबरच माथाडी कायदा करून माथाडींना संरक्षण देण्याचे काम केले. स्व.आण्णासाहेब पाटील यांना आमदारकी सुद्धा याच नेतृत्वाकडून देण्यात आली होती. दुर्दैवाने ते आमदार असतानाच त्यांचे निधन झाले. माथाडींचे दुसरे नेते शशिकांत शिंदे यांना जावली व नंतर कोरेगाव विधानसभा मैदानात उतरवून त्यांना आमदार केले. त्याच पद्धतीने माथाडींचे आराध्य दैवत स्व. आण्णासाहेब पाटील यांच्या नंतर त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यानाही राष्ट्रवादीने विधान परिषदेवर पाठवून आमदारकी दिली.

माथाडी नेते नरेंद्र पाटील हे माथाडींच्या प्रश्‍नावर अनेकवेळी भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ मंत्र्यांच्या संपर्कात होते. माथाडींच्या अनेक कार्यक्रमाच्या व्यासपिठावर त्याना निमंत्रीत केले होते. तेंव्हापासूनच नरेंद्र पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या दोन वर्षापुर्वीपासूनच झळकत होत्या. मात्र शरद पवारांच्या 75 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात स्वतः नरेंद्र पाटील यांनी या वावड्या आहेत व मी राष्ट्रवादी सोडणार नाही, असा खुलासा केला होता. मात्र ढेबेवाडी विभागात ज्या-ज्या वेळी भाजपा, शिवसेना मंत्र्यांचे दौरे होत होते. त्या-त्या वेळी नरेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटी गाठी होत होत्या. त्यावेळीही आम.नरेंद्र पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होत होती. तर आ. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला शासनाने भरीव भांडवल उपलब्ध करून द्यावे, असा आग्रह नरेंद्र पाटील यांनी धरला तेंव्हा शासनाने तात्काळ 200 कोटी निधी देण्याची घोषणा केली होती. या पार्श्‍वभुमीवर भाजपाकडून त्यांना या महामंडळाचे अध्यक्षपद मिळणार व ते भाजपामध्ये जाणार अशी चर्चा संपुर्ण जिल्ह्यात होती. विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपत आल्याच्या काळात नरेंद्र पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळावी ही अपेक्षा होतीच. मात्र ती शक्यता धुसर असतानाच नरेंद्र पाटील यांचे मित्र असलेल्या निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला राम राम करून भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तेंव्हा त्याना निरोप देण्यासाठी म्हणून आ. नरेंद्र पाटील त्यांना भाजपाच्या कार्यालया पर्यंत सोडायला गेले होते. तेंव्हाही अशाच वावड्या उठल्या होत्या.

नुकत्याच भाजपाचा सरकारने महामंडळावरच्या निवडी जाहीर केल्या तेंव्हा त्यामध्ये माजी आम.नरेंद्र पाटील यांची आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपदी नियुक्ती केली. तेंव्हा नरेंद्र पाटील आता भाजपात जाणार अशी चर्चा पुन्हा सूरू झाली. त्यानुसार आज त्यानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मिळालेली पदे आणि राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. आता पुढे काय घडामोडी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ते लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.