होमपेज › Sangli › भाजपमधील ज्योतिषांमुळे पक्षप्रवेश थांबला

भाजपमधील ज्योतिषांमुळे पक्षप्रवेश थांबला

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 09 2017 11:39PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

माझा भाजप पक्षप्रवेश हा शिवसेनेच्या विरोधामुळे नव्हे; तर भाजपमधीलच काही ज्योतिषांमुळे थांबला. त्यांनी मुंबईतील विधान परिषद आणि गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर राणेंचा विचार करा, असा अनाहूत सल्ला दिला, असा टोला माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी पत्रकार बैठकीत बोलताना लगावला. 

मी शिवसेनेत होतो त्या काळाच्या  तुलनेत आता ती संघटना  नगण्य बनली आहे.  अगदी 5 टक्‍के राहिल्याचीही टीका  त्यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी  इडीची नोटीसही तयार असल्याचाही टोला त्यांनी लगावला.

ते म्हणाले, उद्धव ठाकरे राजकीय समजशून्य आणि समाजाची जाण नसलेले नेते आहेत. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना मी त्रास दिला अशा  खोट्या वल्गना थांबवाव्यात. तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा बाळासाहेबांना जो कौटुंबिक त्रास तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी दिला, जनतेसमोर उघड करीन.

राणे म्हणाले, समाजातील शेतकरी, मजूर व  कामगार  अशा सर्व घटनांना न्याय देण्यासाठी स्वाभिमान पक्ष स्थापन केला आहे. शिव्या घालून, लाथा मारून प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठीच आम्ही एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला. 

ते म्हणाले, सत्तेत राहून शिवसेना विरोध करीत आहे; पण सत्तेतून बाहेर पडत नाही. परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफी, जीएसटीसह प्रश्नांवर त्यांचे एकही मंत्री तोंड उघडत नाहीत. उलट सेना हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामकाजात मोठा व्यत्ययच आहेत. त्यामुळे सरकारच्या अपयशात शिवसेना देखील पन्नास टक्के जबाबदार आहे. 

राणे म्हणाले, कोल्हापुरात सहा आमदार असताना त्यांनी एकालाही मंत्री केले नाही. मात्र सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम या पराभूत लोकांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांनी मंत्री केले. ते सर्व आज निष्क्रिय ठरले आहेत. 

राणे यांना भाजपमध्ये घेतो असे सांगून त्यांची फसवणूक केली, असा काँग्रेसनेते आरोप करीत आहेत. याबद्दल विचारता राणे म्हणाले,  मी अद्याप भाजपमध्ये गेलो नाही. पण काँग्रेसने 12 वर्षे कसे फसवले त्याचे उत्तर द्या ना. त्यांनी मला मुख्यमंत्री करतो म्हणून पक्षात घेतले. नेत्यांनी तीनवेळा दिल्लीवारी करून मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले. अगदी तीनवेळा विमानातून परत येईपर्यंत माझे नाव यादीत होते. पण खाली उतरेपर्यंत दुसर्‍याचेच नाव जाहीर केलेले असायचे. प्रत्येक खेपेस त्यांनी अपमान केल्याने काँग्रेस सोडली. काँग्रेसची दिशा संपली आहे. हा पक्ष आता दिशाहीन झाला. 

सरकारविरोधात बोलणार्‍यांचा आवाज दाबला जातो, असे आरोप होत आहेत. याबद्दल विचारता ते म्हणाले, सरकारविरोधात बोलणार्‍यांची ईडी मार्फत चौकशी होते, या आरोपात काही तथ्य नाही. त्यात तथ्य असते तर उध्दव ठाकरेंना ईडीच्या चौकशीचे पत्र मिळाले असते. अर्थात मात्र त्यांच्या भानगडींमुळे ती नोटीस तयार आहेच,असा टोलाही त्यांनी लगावला. गुजरात निवडणूक चुरशीची आहे. पण या निवडणुकीत भाजप सत्ता कायम ठेवील, असेही ते म्हणाले. 

नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपच

पश्‍चिम महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, काँगे्रेस, राष्ट्रवादीचे नेते यांनी दौरे करून नुसतेच एकमेकांवर आरोप करीत वाभाडे काढले. मात्र त्यांनी येथील शेतकर्‍यांच्या समस्या, बेरोजगारी, उद्योग व व्यवसायिकांच्या समस्या याकडे काहीच लक्ष दिले नाही,असे राणे म्हणाले.