होमपेज › Sangli › कवठेमहांकाळ पूर्व भागात दुष्काळाचे संकट

कवठेमहांकाळ पूर्व भागात दुष्काळाचे संकट

Published On: Aug 29 2018 1:29AM | Last Updated: Aug 29 2018 12:13AMनागज : विठ्ठल नलवडे 

कवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्व भागात यंदा दुष्काळाच्या प्रचंड झळा बसू लागल्या आहेत.पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्याने मोठ्या चिंतेत असलेल्या शेतकर्‍यांपुढे बागायती पिके जगवायची कशी हा प्रश्‍न आहे. विहीरी व कूपनलिका कोरड्या पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे.

कवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणार्‍या पिण्याच्या पाण्याच्या सर्वच योजना कुचकामी ठरल्याने पाण्याविना नागरिकांचे हाल सुरू आहेत. तालुक्याच्या  पूर्व भागातील नागज, ढालगाव, चोरोची, चुडेखिंडी, जांभूळवाडी, ढोलेवाडी, दुधेभावी, शिंदेवाडी, घोरपडी, निमज, रायवाडी, केरेवाडी, शेळकेवाडी, आगळगाव, आरेवाडी, लंगरपेठ, ढालेवाडी, इरळी भागात यंदा खरीपाच्या पेरणीपुरतादेखील पाऊस झाला नाही.

पावसाच्या आशेवर या भागातील वीस टक्के पेरण्या झाल्या. थोड्याफार झालेल्या पावसावर ही पिके उगवूनही आली. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने उगवून आलेली पिके वाळून गेली आहेत. खरीप हंगामातून मिळणार्‍या उत्पन्नाची आशा मावळली आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी चिंतेत आहेत. विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्याने द्राक्षेबागांच्या छाटण्या खोळंबल्या आहेत. ऐन बहरात आलेल्या डाळींब बागांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. पाऊस नसल्याने बागायती पिकांना जबर फटका बसला आहे.

पिण्याच्या पाण्याचीही समस्या भेडसावत आहे. या भागातील पिण्याच्या पाण्याच्या बहुसंख्य योजना कुचकामी ठरत आहेत.ढालगाव येथे दुधेभावी तलावातून पाणीपुरवठा केला जातो. पण ते पाणी अशुद्ध असल्याने पिण्यासाठी त्याचा वापर केला जात नाही. इथल्या लोकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना बंद असल्याने आगळगाव येथील ग्रामस्थांना चार ते पाच दिवसांतून एकदा आणि तेही अत्यल्प पाणी मिळते. त्यामुळे तिथेे दहा लीटर पिण्याच्या पाण्यासाठी वीस रूपये मोजावे लागत आहेत. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे पाणीपट्टी भरूनही आगळगाव येथील ग्रामस्थांना प्रादेशिक नळपाणी योजनेचे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी  आहेत.

या भागातील अन्य गावांना पाणीपुरवठा करणार्‍या तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने त्या योजनाही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा दुष्काळग्रस्त रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

इथला दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी या भागाला वरदान ठरणार्‍या  सिंचन योजना पूर्ण करणे हा एकमेव पर्याय आहे.  टेंभू योजनेची ढालगाव वितरिका व म्हैसाळ योजनेची आगळगाव उपसा सिंचन योजना तातडीने पूर्ण करण्याची आग्रही मागणी या भागातील शेतकर्‍यांमधून होत आहे.

येत्या सहा महिन्यात या दोन्ही योजना पूर्ण होऊन कार्यान्वित झाल्या तरच या भागातील बागायती पिकांना जीवदान मिळणार आहे. अन्यथा,  द्राक्षे व डाळींब बागा काढून टाकण्याशिवाय पर्याय राहणार नाही.