Mon, Jul 22, 2019 02:37होमपेज › Sangli › मनपा, ठेकेदार, एमजेपीचा संगनमताने दरोडा

मनपा, ठेकेदार, एमजेपीचा संगनमताने दरोडा

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 12:15AMसांगली : प्रतिनिधी

ड्रेनेज योजनेची कामे निकृष्ट, रस्त्यांची दुरवस्था असा कारभार सुरू आहे. आता तर प्रकल्पाचे काम बंद ठेवण्यात आले आहे. तरीही आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी झाली. एकूणच आतापर्यंत योजनेच्या नावे महापालिका, ठेकेदार आणि सल्लागार   जीवन प्राधीकरणाने संगनमताने जनतेच्या निधीवर दरोडाच घातला आहे, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक शेखर माने यांनी केला. ड्रेनेज योजनेच्या आढावा बैठकीत त्यांनी पुराव्यांसह त्याचा पर्दाफाश केला.

या सर्वच कारभारावर नियंत्रण ठेवण्याची शासनाचा विभाग म्हणून एमजेपीची जबाबदारी होती. त्यांनीही या दरोडेखोरीत सहभाग घेतला आहे. त्यामुळे एमजेपीलाही काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी केली. ठेकेदाराला आतापर्यंत दिलेल्या सर्व बिलांची तपासणी केल्यास बर्‍याच भानगडी उघड होतील, असा इशाराही त्यांनी दिला. अखेर सोमवारपासून ड्रेनेज योजनेचे काम करू, असे ठेकेदाराने असे आश्‍वासन दिले.

भारतभीम जोतीरामदादा पाटील कुस्ती आखाडा केंद्रातील मलनिस्सारण केंद्रात दोन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेने एमजेपी व ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून दोघांनीही प्रकल्पाचे काम थांबविले आहे. यासंदर्भात आयुक्त रविंद्र खेबुडकर यांच्या दालनात एमजेपीचे अधिकारी, ठेकेदाराचे प्रतिनिधी व नगरसेवकांची संयुक्त बैठक घेतली.  बैठकीला गटनेते किशोर जामदार, शेखर माने, शिवराज बोळाज, प्रशांत पाटील मजलेकर, दिलीप पाटील उपस्थित होते. यावेळी जीवन प्राधीकरणच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याकडे स्टाफ कमी आहे. तसेच आमची करारपत्राची मुदत संपल्याने काम थांबविल्याचे स्पष्ट केले. 

माने यांनी प्राधीकराच्या अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. ते म्हणाले, ड्रेनेज प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी एमजेपीवर आहे. त्यामुळे तुम्हाला असे मध्येच काम कसे सोडता येईल. तुम्ही जर ते थांबवले तर तुम्हाला काळ्या यादीत टाकावे. ते म्हणाले, सांगलीवाडीत ड्रेनेज कामावर एक कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. त्या दुर्घटनेपासून एमजेपी व ठेकेदार दोघांनीही बोध घेतला नाही. पुन्हा योजनेच्या कामाचा हलगर्जीपणा सुरूच आहे. यामुळेच मलनि:स्सारण केंद्रात दुर्घटना घडली. दोघांचे बळी गेले. त्यातही आता एमजीपी हात झटकत आहे. त्यांना ही जबाबदारी टाळता येणार नाही. यावर खेबुडकर यांनी एमजेपीला काम सुरू करण्याबाबत लेखी देऊ, असे स्पष्ट केले.ठेकेदाराला काम बंद ठेवल्याबद्दल जाब विचारण्यात आला. यावेळी ठेकेदाराने गेल्या महिन्यात झालेल्या दुर्घटनेनंतर मानसिक खच्चीकरण झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कारण देत काम बंद केल्याचे कारण पुढे केले. याबाबत माने म्हणाले, असली कारणे देऊन नागरिकांची गैरसोय करू नका. काम सुरू झालेच पाहिजे. 

ठेकेदाराने त्याच्या थकित 1 कोटी 84 लाख रुपये थकित असल्याचा दावा केला. ते बिल द्यावे, अशी मागणी केली. यावर आयुक्तांनी ठेकेदाराचे बिल दिले जाईल, अशी ग्वाही दिली.  माने यांनी खेबुडकर यांच्या उत्तराला हरकत घेत ठेकेदाराचे बिल का अडविले आहे, याचा खुलासा करावा. यावर पाणीपुरवठा अभियंता शीतल उपाध्ये म्हणाले, एमजेपीकडून तपासून ठेकेदारांची बिले सादर होतात. त्यानुसार आता एमजेपीकडून आलेले ठेकेदाराचे चुकीचे तयार करण्यात आहे. त्यामुळे ते बिल दुरुस्तीसाठी पाठविल्याचे सांगितले. महापालिकेकडे 10 टक्के बिल महापालिकेकडे प्रलंबित ठेवण्याची अट निविदा करारात आहे. ठेकेदाराचे सध्याचे थकित बिल एकूण योजनेच्या एक टक्केही नाही. 

माने म्हणाले, तसे असेल तर एकूणच सबकुछ गोलमाल आहे. महापालिका, ठेकेदार आणि एमजेपी यांनी चुकीचा कारभार करून ठेकेदाराचे कोटकल्याण केले आहे.  प्रशांत मजलेकर यांनी विरोध केला. संजयनगर, शिंदे मळा या परिसरातील ड्रेनेज वाहिन्या कार्यान्वित केल्या जाणार आहेत. या वाहिन्यातील मैला शेरीनाल्यात सोडण्याचा डाव प्रशासनाने आखला आहे. त्याला  मजलेकर यांनी विरोध केला. 

वाढवून मापे दाखवा, महापालिकेला लुटा

माने म्हणाले, ठेकेदाराचे एक कोटी 84 लाख रुपयांचे बिल थकित आहे. या बिलाची तपासणी केल्यास त्यातील मूळ बिल हे 50 लाख रुपये आहे. उर्वरित 50 लाख ही भाववाढ तसेच 35 लाख रुपये जादा कामाचे बिल आहे. वास्तविक ड्रेनेजच्या मूळ आराखड्यात दोन मीटरने खोदाईचे काम करण्यास सांगितले होते. असे असताना ठेकेदाराने सात मीटरने जादा खोदाई केली आहे. त्याने वाढीव बिल महापालिकेच्या नावावर टाकले आहे. एकूणच मापे वाढवा, महापालिकेला लुटा असा धंदा सुरू आहे.  याला जबाबदार कोण?