होमपेज › Sangli › इस्लामपूरमध्ये रस्त्याचे काम राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाडले बंद

इस्लामपूरमध्ये रस्त्याचे काम राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाडले बंद

Published On: Feb 11 2018 12:56AM | Last Updated: Feb 10 2018 9:26PMइस्लामपूर : वार्ताहर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी  येथे दौर्‍यावर येत आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या पोलिस स्टेशन व पोलिस निवासस्थान परिसरातील रस्त्यांचे भाग्य उजाडले आहे. या रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. मात्र हे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी एका रस्त्याचे काम बंद पाडले.

येथील पोलिस परेड ग्राऊंडवर रविवारपासून जिल्हा कृषी महोत्सव सुरू होत आहे. या महोत्सवाच्या  उद्घाटनाला सोमवारी मुख्यमंत्री येणार आहेत. मुख्यमंत्री ज्या रस्त्यावरून येणार आहेत, त्या पोलिस ठाण्याच्या पूर्वेच्या व उत्तरेकडील रस्त्यांची अनेक वर्षांपासून अत्यंत दुरावस्था झाली आहे. जिल्हाधिकारी विजय कळम-पाटील यांनी पालिकेला या दोन्ही रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याचे आदेश दिले होते. यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन मंडळातून देण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते. 

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने गेल्या दोन दिवसांपासून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पालिकेने सुरू केले आहे. पोलिस वसाहतीसमोरील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. 

पोलिस ठाण्यापासून महादेवनगराकडे जाणार्‍या रस्त्याचे काम सुरू असताना या कामाची वर्क ऑर्डर दाखवा, कामाचे एस्टीमेट दाखवा, अशी मागणी करीत रस्त्यावरील धूळ न काढता, डांबर न टाकता हे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी हे काम बंद पाडले. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यानिमित्त का होईना, या रस्त्यांचे काम मार्गी लागत असल्याने या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते.  या रस्त्यावरून अनेक विद्यार्थी व महादेवनगर परिसरातील नागरिकांची ये-जा असते. आता एकाच रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तर दुसर्‍या रस्त्याचे काम मात्र बंद पाडल्याने या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.