होमपेज › Sangli › युवक राष्ट्रवादीचे आक्रोश आंदोलन

युवक राष्ट्रवादीचे आक्रोश आंदोलन

Published On: Feb 02 2018 1:34AM | Last Updated: Feb 01 2018 10:35PMसांगलीः प्रतिनिधी

वाढती बेरोजगारी, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे  बंद पडलेले उद्योग आदी प्रश्‍नासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते गुरुवारी रस्त्यावर उतरले. केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. 

विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरूवात झाली. माजी आमदार विलासराव शिंदे, युवक  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते - पाटील, उपाध्यक्ष नावीद मुश्रीफ,  शहर जिल्हाध्यक्ष  संजय बजाज, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, जि. प. सदस्य शरद लाड, ताजुद्दीन तांबोळी, आदित्य फरास,  संग्राम रास्ते, योगेंद्र थोरात, सचिन जगदाळे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  कोते-पाटील, ताजुद्दीन तांबोळी आदींचे भाषण झाले. त्यानंतर शिष्टमंडळने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. 

निवेदनात म्हटले आहे, पंतप्रधान मोदी यांनी  प्रचारात वर्षाला दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र 2 हजार सुद्धा नवीन नोकर्‍या निर्माण झाल्या नाहीत. नोटाबंदी, जीएसटी यामुळे व्यापार, उद्योग बंद पडले. युवकांना बेरोजगार  होण्याची वेळ आली.

कौशल्य विकास योजनेच्या राज्यात 7 हजार 252 प्रशिक्षण संस्था पैसा न मिळाल्याने बंद पडल्या. त्यामुळे 55 हजार कर्मचारी बेरोजगार झाले. डी.एड. , बी. एड. झालेल्या लाखो युवकांना बेरोजगार होण्याची वेळ आली. उद्योगाला चालना देऊन रोजगार तयार होण्यासाठी प्रयत्न करावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा यावेळी इशारा देण्यात आला.