Wed, Apr 24, 2019 21:29होमपेज › Sangli › राष्ट्रवादीकडे इच्छुक उमदेवारांची तोबा गर्दी

राष्ट्रवादीकडे इच्छुक उमदेवारांची तोबा गर्दी

Published On: Jul 02 2018 1:48AM | Last Updated: Jul 01 2018 9:34PMसांगली : प्रतिनिधी

समर्थकांचा अलोट उत्साह, नेत्यांचा जयजयकार, पक्षाच्या विजयाच्या घोषणा करीत  पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुकांची जोरदार शक्‍तीप्रदर्शन करत मुलाखती दिल्या. जुन्यांऐवजी यावेळी नव्या चेेहर्‍यांसह युवकांना संधी देण्याची मागणी करीत अनेकांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना साकडे घातले. कोणी मोटारसायकल रॅलीने, तर कोणी बैलगाडीतून कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह दाखल होत होते. 
पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील, राहुल पवार, ताजुद्दीन तांबोळी, सागर घोडके, विनया पाठक, पद्माकर जगदाळे, धनपाल खोत, वंदना चंदनशिवे, जयश्री जाधव, मैनुद्दीन बागवान आदींनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. 
सकाळी 10 वाजता मुलाखती सुरू झाल्या.  अकरानंतर मात्र सांगली - मिरज रस्त्यावर परिसरात इच्छुकांची गर्दी वाढू लागली. 

सकाळच्या सत्रात प्रभाग 10, 19, 11, 9, 18 मधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. इच्छुकांमध्ये जुन्याबरोबरच नवीन चेहरेही  दिसत होते. गेल्या वेळेला राष्ट्रवादीने संधी दिलेल्या नगरसेवकांबद्दल नाराजी व्यक्‍त करीत नव्या युवकांना संधी देण्याची मागणी अनेकांनी केली. उमेदवारीसाठी जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याचीही मागणी करण्यात आली.  शहराचा विकास तसेच सामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि राष्ट्रवादी पक्ष महापालिका क्षेत्रात रुजविण्यासाठी संधी देण्याची मागणी अनेकांनी केली. 

ढोल ताशे अन् बैलगाडी

पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी  कोणी उघड्या चारचाकी  तर कोणी बैलगाडीतून येत होते. त्यांच्या मागून समर्थकांचा ताफा जयजयकार करीत येत होता. त्यामुळे मार्केट यार्डसमोरील रस्त्यावर गर्दी होत होती. महिला समर्थकांची मोठी गर्दी होती. 

धनदांडग्यांना उमेदवारी नको

ज्यांच्याकडे पैशाची ताकद आहे, त्यांनाच  उमेदवारी दिली जात आहे. त्यामुळे  पक्षासाठी काम करणारे निष्ठावंत मागे राहतात. उमेदवारीसाठी  पक्षात आलेल्यांना  तिकीट दिले जाते. धनदांडग्याऐवजी सामान्य तरुणांना संधी द्यावी, अशीही मागणी अनेक समर्थकांनी केली.

आज मिरज व कुपवाडला मुलाखती

संजय बजाज म्हणाले, अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे. सांगलीतील 11 प्रभागाच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. सोमवारी उर्वरित मिरज व कुपवाड येथे मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. एकूण 298 इच्छुकांनी आमच्याकडे उमेदवारीसाठी अर्ज केलेला आहे. उमेदवारीबाबत  काँग्रेसबरोबर आघाडीचा निर्णय झाल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे निर्णय घेतील, असे म्हणाले. 

काँग्रेसबरोबर आघाडी व्हावी ही इच्छा : बजाज

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज पत्रकारांशी बोलताना म्हणाले,  दिवसभरात सांगलीतील 11 प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला.  298 जणांनी आमच्याकडे अर्ज भरलेले आहेत.  काँग्रेस बरोबर चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या 31 आणि राष्ट्रवादीच्या 27 जागा निश्‍चित आहेत. अर्वरित 20 जागांबाबत निर्णय व्हायचा आहे. त्याचीच चर्चा करण्यात येणार आहे. आ. जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील हे जे निर्णय देतील त्यानुसार काम करू.