Mon, Mar 25, 2019 13:19होमपेज › Sangli › ‘राष्ट्रवादी’चा काँग्रेस बरोबर भाजपलाही धक्का

‘राष्ट्रवादी’चा काँग्रेस बरोबर भाजपलाही धक्का

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 07 2018 7:32PMमिरज : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत प्रभाग क्र. 6 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांनी मोठ्या मताधिक्क्यांनी विजय मिळवून भाजपला जोरदार धक्का दिला आहे. निवडणुकीपूर्वी बहुसंख्य मुस्लिम मतदार असलेल्या या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय काँग्रेसला बाजूला सारुन चारही जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने खर्‍या अर्थाने भाजप बरोबर काँग्रेसलाही चांगलाच झटका दिला आहे.या प्रभागात मुस्लिम बहुसंख्य मतदार असल्याने काँग्रेसनेही सुरुवातीस सर्व जागा लढविण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी केली होती. परंतु, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्याने आपला हक्काचा मतदार असतानाही काँग्रेसने या प्रभागातील सर्व चारही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ  केल्या. 

संपूर्ण प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यामध्ये काँग्रेसचा पहिला पराभव झाला होता. काँग्रेसमधून इच्छुक असलेल्यांनी जोरदार तयारी केली होती. माजी नगरसेवक दिवंगत महमंद काझी यांच्या पत्नी रझीया काझी, माजी आ. दिवंगत हाफीज धत्तुरे यांचे जावई अकबर मोमीन यांनी जोरदार तयारी केली होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसने रझीया काझी यांना ऐनवेळी आपल्या पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली. माजी महापौर मैनुद्दीन बागवान व इद्रिस नायकवडी यांच्या राजकीय खेळीमुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी पूर्वीचे मतभेद बाजूला ठेऊन या प्रभागात बागवान, नायकवडी सांगतील त्यांनाच उमेदवारी दिली.

सुरुवातीस इद्रिस नायकवडी यांचा या प्रभागात मिरज संघर्ष समितीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा विचार होता.परंतु पक्षाची उमेदवारी मिळते म्हटल्यावर त्यांनी मिरज संघर्ष समिती बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रभाग क्र. 6 मध्ये मुलगा अतहर नायकवडी यांना उमेदवारी दिली. तर स्वत: प्रभाग क्र. 5 मधून निवडणूक लढवली. नायकवडींना पुन्हा राष्ट्रवादीकडे आणण्यात माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचा सिंहाचा वाटा आहे.

या प्रभागात भाजप नगण्य होती. आणि काँग्रेसही मैदानात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोकळे मैदान मिळाले होते. त्यामुळे महापालिका क्षेत्रात मैनुद्दीन बागवान व रझीया काझी यांनी सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी होण्याचा मान मिळविला. अतहर नायकवडी, नरगीस सय्यद याही विजयी झाल्याने या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसला सहज विजय प्राप्तझाला. अतहर नायकवडी यांच्या विरोधात माजी नगरसेवक अल्लाउद्दीन काझी यांनी आव्हान दिले होते. परंतु त्यांना दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली. तर अन्य तीन गटामध्ये भाजप दुसर्‍या स्थानावर राहिली. सुरुवातीस या प्रभागात एमआयएमचे उमेदवार शाहीद पिरजादे यांनी आव्हान उभे केले होते. पिरजादे यांना 2122 इतकी तिसर्‍या क्रमांकाची मते मिळाली. मिरज शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत 8 जागा मिळाल्या. यापैकी 4  जागा  या  प्रभागातीलच  आहेत. इद्रिस नायकवडी यांचा पराभव झाला असलातरी नायकवडी व बागवान गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दबदबा निर्माण झाला आहे.