Fri, May 24, 2019 20:34होमपेज › Sangli › प्रभागवार ताकदीनुसारच राष्ट्रवादीशी आघाडीचा निर्णय 

प्रभागवार ताकदीनुसारच राष्ट्रवादीशी आघाडीचा निर्णय 

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 03 2018 11:25PMसांगली : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली महापालिका निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करूनच लढू, असे वक्तव्य केले आहे.  त्यांनी तसा पुढाकार घेतला असला तरी काँग्रेसची ताकद मोठी आहे. त्यामुळे प्रभागनिहाय ताकद पाहूनच निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले. त्यांची ताकद आणि त्यानुसार किती जागा द्यायच्या, आघाडी कशी करायची, याचा निर्णय स्थानिक नेतेच घेतील, असे चव्हाण म्हणाले.

जिल्हापरिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी वेगळी लढल्याने सत्ता गेली. त्यामुळे काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडी करून महापालिका निवडणूक लढवावी, असा सूर व्यक्त होतो आहे. याबद्दल विचारता ते म्हणाले, काँग्रेस अशा गोष्टींचा मुकाबला करण्यास सज्ज आहे. विकासकामांच्या जोरावर मनपातील सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षमही आहे. अर्थात राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची की नाही याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेते व कार्यकर्त्यांच्या मतावर अवलंबून आहे. त्यांना विश्‍वासात घेऊनच आम्ही आमचा फैसला करू. त्यासाठी लवकरच स्थानिक नेतेमंडळी व कार्यकर्ते बैठक घेतीत. 

ते म्हणाले, महापालिकेतील सत्तेची खुर्ची मिळविण्यासाठी भाजपचे नेते राज्यातील सत्तेचा गैरवापर करीत आहेत. याठिकाणच्या विकासकामांना जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत. महापालिकेचा निधी नियोजन समितीकडे वर्ग करणे, एलबीटीचे अनुदान उशिरा देणे, आयुक्त व अनेक अधिकार्‍यांना सरकारच्या इशार्‍याप्रमाणे काम करण्यास भाग पाडणे असे प्रकार सुरू आहेत. 
चव्हाण म्हणाले, सत्तेचा गैरवापर करून चाललेला हा उद्योग लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील नागरिक विकासकामांपासून वंचित राहून त्याचा फटका सत्तेवर असलेल्या पक्षाला व्हावा, असा त्यांचा उद्देश आहे. भाजपचा हा डाव आम्ही उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. 

चव्हाण म्हणाले, महापौर, उपमहापौरांसह लोकप्रतिनिधींचा आदर राखणे अधिकार्‍यांचे कर्तव्य आहे. कोणाच्या हातचे बाहुले होऊन जर ते असा कारभार करीत असतील तर उद्या निवडणुकीनंतर पुन्हा आमच्याशी गाठ आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. 

यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील, युवक काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर हारुण शिकलगार आदी उपस्थित होते.