Thu, Feb 21, 2019 09:02होमपेज › Sangli › हार-तुरे बंद करा, आता मला काम करू द्या!

हार-तुरे बंद करा, आता मला काम करू द्या!

Published On: May 13 2018 6:18PM | Last Updated: May 13 2018 1:08PMइस्लामपूर : मारूती पाटील

हार-तुरे बंद करा की....मला आता काम करु द्या! अशी विनंती करण्याची वेळ राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांच्यावर आली आहे. निवडीनंतर आ. पाटील यांच्यावर आजही कार्यकर्ते व  हितचिंतकांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. त्यामुळे  पाटील यांचा सत्कारातच फार वेळ जात असल्याने त्यांच्यावर अशी विनंती करण्याची वेळ आली आहे. 29 एप्रिलला जयंत पाटील यांची  राष्ट्रवादीचे  प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली. तेव्हापासून ज्या-ज्यावेळी आ. पाटील हे इस्लामपूरला असतील त्यावेळी सबंध जिल्ह्यातून कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी इस्लामपुरात येत आहेत. निवडीनंतर इस्लामपुर शहरातूनही त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती.  ही मिरवणूक सुारे तीन तास चालली होती.

आ. जयंत पाटील यांच्या निवासस्थानी आजही सत्कारासाठी लोकांची रिघ सुरु आहे. अनेक तास लोक त्यांना भेटण्यासाठी ताटकळत बसत आहेत. यामध्ये कामे घेऊन आलेल्यांचाही समावेश आहे. त्यातच  सध्या लग्नसराईची धामधू सुरू आहे. लोकांच्या अडी-अडचणी, मयत भेटी, कार्यक्रमांना उपस्थिती व लग्न समारंभाला हजेरी ! हा सर्व व्याप सांभाळताना सत्कार स्वीकारण्यातच त्यांचा फार वेळ
जात आहे.

शनिवारी पहाटे आ. पाटील अहमदनगरहून इस्लामपूरला आले. थोडी विश्रांती घेतात न घेतात तोपर्यंत सकाळपासूनच कार्यालयात कार्यकर्त्यांची वर्दळ सुरु झाली.  यामध्ये कामे घेऊन येणार्‍यांच्या बरोबरच सत्कार करणारांचाही समावेश होता. त्यातच पाटील यांना दिवसभर 32 लग्नांना उपस्थित रहायचे होते.  सकाळचा पहिला मुहुर्त साधायची वेळ जवळ आलेली आणि भोवती  भेटाय  आलेल्यांचा गराडा! त्यामुळे त्यांना बाहेरही पडता येत नव्हते. त्यामुळे पाटील यांनी आता सत्कार, हार तुरे थांबऊया. यामध्ये फार वेळ जातोय. मला काम करायला वेळ द्या , अशी विनंती सर्वांना केली.