Thu, Jul 18, 2019 20:42होमपेज › Sangli › आघाडीचे गुर्‍हाळ शेवटपर्यंत चालणार

आघाडीचे गुर्‍हाळ शेवटपर्यंत चालणार

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 29 2018 9:04PMसांगली : प्रतिनिधी

सांगली महापालिका निवडणुकीत आघाडी करणे ही काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही पक्षांची मजबुरी आहे. त्यासाठी सध्या चर्चेच्या फेर्‍या सुरू आहेत. हे चर्चेचे गुर्‍हाळ शेवटपर्यंत सुरू ठेवले जाणार आहे.  उमेदवार भाजपमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी अंतिम क्षणी आघाडी जाहीर करण्याची खेळी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी रचली आहे. तसेच प्रत्येक प्रभागातील उमेदवार व पक्षाच्या ताकदीनुसार जागा वाटप होण्याची शक्यता आहे. 

भाजपचा उधळलेला विजयाचा वारू रोखण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याच्या हालचाली राज्यभर सुरू आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी चर्चा सुरू झाली आहे. अर्थात यामागे या दोन्ही पक्षांची हतबलता कारणीभूत आहे. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक ‘करो या मरो’ ची आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेते सावधानतेने पावले टाकत आहेत.  दोघे मिळून भाजपचा सामना करू, असा फॉर्म्युला पुढे आला आहे.  यातूनच आघाडीच्या प्रस्तावावर चर्चेच्या फेर्‍या झडणे सुरू झाले आहे.

महाआघाडीव्दारे  राष्ट्रवादीच्या कारभाराचा ‘चांगलाच’ अनुभव सांगलीकरांना आला आहे.  स्वतंत्रपणे लढलो तर याचा फटका बसू शकतो याचा अंदाज राष्ट्रवादीला आहे. त्यातच जयंत पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे होम ग्राऊंडवरील सांगली महापालिकेची निवडणूक जिंकणे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे आहे. येथे हार झाली तर राज्यभर चुकीचा मेसेज जाऊ शकतो, याची भीती जयंत पाटील यांना आहे.  त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आघाडीसाठी खूप उत्सुक आहेत. जिंकलो तरी राज्यात प्रतिष्ठा राहणार आणि  पराभव झाला तरी त्याचे खापर आघाडीच्या माथ्यावर फोडता येणार, अशी चाल त्यांची आहे. 

सध्या काँग्रेस महापालिकेमध्ये सत्तेत आहे. सत्तेनंतर पुन्हा सत्ता मिळविणे  तशी तारेवरची कसरत असते, मात्र शेवटच्या काही महिन्यांत काँग्रेसने जोरदार विकासकामे करून निवडणुकांची जोरदार तयारी केली आहे. अर्थात काँग्रेसची ताकद नाकारता येणार नाही.  त्यामुळे काँग्रेस नेते राष्ट्रवादीला सहजासहजी आपल्या तंबूत प्रवेश करू देण्यास इच्छुक नाहीत.  राष्ट्रवादीला बरोबर घ्यायचे पण दाबून ठेवायचे, अशी खेळी काँग्रेस नेते खेळत आहेत. यातून आघाडीच्या प्रस्तावाला काँग्रेस नेत्यांकडून सावधपणे प्रतिसाद दिला जात आहे. जास्तीत जास्त  ओढून धरायचे, धोरण काँग्रेसचे आहे.

या दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. ही गर्दी पक्षांसाठी चांगली असली तरी ती व्यवस्थित हाताळता न आल्यास तितकीच तोट्याची ठरू शकते. उमेदवारी नाकारल्यास या दोन्ही  पक्षांतील इच्छुक भाजपमध्ये  प्रवेश करू शकतात. भाजपवाले यासाठी गळ टाकूनच  बसले आहेत. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते सावध झाले आहेत. आघाडीची चर्चा सुरू केली आहे. दोन्ही बाजूकडून प्रस्तावांचे आदान-प्रदान सुरू आहे. पण कोणताही निर्णय घेतलेला नाही. पक्षातील इच्छुकांना अंधातरी ठेवले आहे.  एबी फॉर्म अर्जासोबतच दि. 11 अखेरपर्यंत द्यायचा आहे. त्यावेळीच  जागा वाटप अंतिम होण्याची शक्यता आहे. यामुळे  तिकीट नाकारलेला  उमेदवार ‘गयाराम’ होण्याची शक्यता फार कमी आहे.  फार  तर उमेदवारी न देण्याची शक्यता गृहित धरुन अपक्ष अर्ज भरणार्‍यांना उमेदवारांना इतर पक्ष पाठिंबा देऊ शकतो. पण हे प्रमाण फारसे राहणार नाही. दुसरी  बाब म्हणजे उमेदवारी डावलण्याची  शक्यता असलेले आधी  इतरत्र  जाणार आहेत, त्यामुळे भाजपमधील मूळ इच्छुक नाराज  होण्याची शक्यता आहे.  या खेळीमुळे भाजपमध्ये जाणार्‍यांना बर्‍याच जणांना अटकाव होऊ   शकतो, असा  काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा कयास आहे. यातूनच आघाडी करण्याबाबत वेळकाढूपणा  सुरू आहे.