Sun, Aug 25, 2019 12:49होमपेज › Sangli › महापालिकेत आघाडीला 60 पेक्षा अधिक जागा मिळतील

महापालिकेत आघाडीला 60 पेक्षा अधिक जागा मिळतील

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 30 2018 12:00AMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 60 हून अधिक जागा मिळतील. भाजपच्या ‘शेवटच्या प्रयत्नांना’ मतदार भीक घालणार नाहीत, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

पाटील म्हणाले, धर्मनिरपेक्ष मतांची फूट होऊन जातीयवादी भाजपला त्याचा फायदा होऊ नये यासाठी महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली आहे. या आघाडीला निश्‍चितपणे मोठे बहुमत मिळणार आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरांमधून मतदारांचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना मोठे पाठबळ मिळत आहे. 
इथे येणे अडचणीचे का वाटते?

पाटील म्हणाले, सांगली महापालिका निवडणुकीत भाजपचे केंद्र व राज्य शासनातील अनेक मंत्री येणार असे सांगितले जात होते. मात्र मुख्यमंत्री आले नाहीत. केंद्र, राज्यातील अनेक मंत्रीही आले नाहीत. इथे येणे त्यांना अडचणीचे वाटते आहे. त्यामुळे निवडणुकीचा कौल काय असणार आहे याचे भविष्य सांगण्याची गरज उरली नाही. 

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. सत्ता आल्यास अनेक विकास कामे केले जातील. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरांचा विकास साधला जाईल. या तीनही शहरांची अधिक प्रगती केली जाईल. 

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने इच्छुकांचे मेरिट पाहून उमेदवारी दिलेली आहे. काही इच्छुकांनी बंडखोरी केली असली तरी आघाडीचेच उमेदवार निवडून येतील. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 60 हून अधिक जागा मिळतील, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला. 

पाटील म्हणाले, भाजप केंद्र, राज्यात सत्ताधारी आहे. त्यांच्या दादागिरीला, प्रलोभनाला मतदार बळी पडणार नाहीत. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने दक्ष रहावे. भाजपने जेवढे प्रयोग करायचे तेवढे केले आहेत. त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. आता शेवटचे तीन दिवस उरले आहेत. भाजपच्या शेवटच्या प्रयत्नांनाही  मतदार भीक घालणार नाहीत.  राष्ट्रवादीचे  शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील  उपस्थित होते.