होमपेज › Sangli › मनसेला माणसे मिळतात, राष्ट्रवादीला का नाही?

मनसेला माणसे मिळतात, राष्ट्रवादीला का नाही?

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 11:58PMसांगली : प्रतिनिधी

बुथ कमिट्या स्थापण्याचे असमाधानकारक कामकाज पाहून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांनी पदाधिकार्‍यांना खडे बोल सुनावले. पाट्या टाकू नका, काम करा. मनसेला माणसे मिळतात, राष्ट्रवादीला का नाही, असेही त्यांनी सुनावले. बुथ कमिट्यांत राज्यात सांगली जिल्हा सर्वात पिछाडीवर का, असा सवालही त्यांनी केला. 

पाटील यांनी सांगली जिल्हा ग्रामीणची बैठक घेतली. जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील, इलियास नायकवडी,  महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छाया पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील गटनेते शरद लाड,  आटपाडीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, खानापूरचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, तासगावचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देसाई, दिनकर पाटील, मिरजेचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब हुळ्ळे, बाळासाहेब होनमोरे तसेच वाळवा, शिराळा, पलूस, कडेगावचे तालुकाध्यक्ष तसेच बाळासाहेब पाटील व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

जयंत पाटील यांनी तालुकानिहाय बुथ कमिट्या स्थापनेचा आढावा घेतला. बुथ कमिट्या स्थापन करण्यात बहुसंख्य तालुक्यांचे कामकाज असमाधानकारक आहे. त्यामुळे  जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यात अन्य जिल्ह्यांमध्ये बुथ कमिट्या स्थापण्याचे काम जवळपास झाले आहे. सांगली जिल्हाच पाठीमागे का राहिला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

असमाधानकारक कामकाजामुळे त्यांनी कडक पवित्राही घेतला. पाट्या टाकू नका. अ‍ॅक्टीव्ह व्हा. दि. 31 जुलैपर्यंत सर्व बुथ कमिट्या स्थापन झाल्या पाहिजेत.  एक-दोन व्यक्ती नेमल्या तरी चालेल, पण बुथ कमिट्या स्थापन करा, असे त्यांनी सांगितले.  

मिरज तालुक्याचा आढावा देताना हुळ्ळे म्हणाले, बुथ कमिट्यांचे सर्व नियोजन मनोज शिंदे यांच्याकडे दिले आहे. त्यावर जयंत पाटील म्हणाले, अशा पद्धतीने काम केेले जात असेल तर राजीनामे घ्यायला पाहिजेत. जत तालुक्याचा आढावा देताना अ‍ॅड. बसवराज धोडमणी म्हणाले, जनसुराज्यचे बसवराज पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. ते आल्यानंतर समन्वयाने बुथ कमिट्या स्थापन केल्या जातील. त्यावर विलासराव शिंदे म्हणाले, त्यांचा प्रवेश होईल. पण तोपर्यंत बुथ कमिट्यांचे काम थांबवू नका. दरम्यान, बुथ कमिट्यांसाठी निरीक्षक नेमण्यात आले. ताजुद्दीन तांबोळींना चार तालुक्यातून मागणी आली. त्यांना आटपाडीचे निरीक्षक म्हणून नियुक्त केले.