होमपेज › Sangli › आयुक्‍तांनी शहराचे वाटोळे थांबवावे

आयुक्‍तांनी शहराचे वाटोळे थांबवावे

Published On: Dec 14 2017 1:46AM | Last Updated: Dec 13 2017 10:47PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

राजकीय द्वेषाने विकासकामे अडवून आयुक्तांनी मनमानी कारभार करीत शहराचे वाटोळेच सुरू केले आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नगरसेवकांनी केला. हा खेळ थांबवावा, तत्काळ धूळखात पडलेल्या फाईल मार्गी लावाव्यात, अन्यथा आयुक्त हटावसाठी लढा उभारू, असा इशारा त्यांनी दिला.

यासाठी बुधवारपासून त्यांनी महापालिकेच्या मुख्यालयात शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सत्याग्रह ठिय्या आंदोलन सुरू केले. आता वर्क ऑर्डरशिवाय हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. घोषणाबाजी करीत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.

यासंदर्भात विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते म्हणाले, शिस्त आणि पारदर्शी कामाच्या नावे आयुक्‍तांनी हा विकासकामे अडवायचा खेळ सुरू केला. परंतु आम्ही आज ना उद्या त्यांच्याकडून कामाला गती मिळेल म्हणून संयम ठेवला. परंतु त्यांचे हेतू आणि बोलवते धनी वेगळेच असल्याचे निष्पन्न झाले आहे. वास्तविक आम्ही विकासकामे कोणत्याही पद्धतीने करा, पण ती झाली पाहिजेत, असे त्यांना भेटून सांगितले. पण राजकीय नेत्यांप्रमाणे त्यांचा निव्वळ कामे मंजुरीचा खोटा स्टंट सुरू आहे. त्यासाठी 188 कोटी रुपयांची विकासकामे मंजुरीच्या घोषणाच सुरू आहेत. प्रत्यक्षात किती कामे झाली, सुरू आहेत याबाबत त्यांचे मौनच आहे. महासभा, स्थायी समिती सभांत याबाबत वारंवार जाब विचारला. परंतु त्यालाही ते उत्तर द्यायला तयार नाहीत.

ते म्हणाले, एकीकडे नगरसेवकांची प्रभागातील विकासकामे अडवायची आणि दुसरीकडे आपल्या सोयीच्या विषयांत नियमबाह्य मंजुरीचा सपाटा लावायचा, असा त्यांचा आणि त्यांच्या अधिकार्‍यांचा कारभार सुरू आहे. आता दोन-चार महिन्यांत निवडणूक असूनही त्यांना गांभीर्य नसेल तर करायचे काय?

विष्णु माने म्हणाले, पाच-पन्नास हजार रुपयांची कामे आयुक्‍त अडवितात. मग अमृत योजना, घनकचरा, ड्रेनेज योजनेबाबत मात्र त्यांनी परस्पर निर्णय घेऊन ठेकेदारांना पैसे, वर्क ऑर्डर दिल्या कशा? आता आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. 

युवराज गायकवाड म्हणाले, जर 188 कोटी रुपयांची विकासाकामे मंजूर केली आहेत. तर त्या सर्वच कामांच्या वर्क ऑर्डर मिळाल्याच पाहिजेत. ती सुरू झाल्याशिवाय आम्ही हटणार नाही. प्रसंगी वाट्टेल ते होऊ दे. 

यावेळी संगीता हारगे, आशा शिंदे, स्नेहा औंधकर, प्रियांका बंडगर, कांचन भंडारे, अंजना कुंडले, प्रार्थना मदभावीकर, आनंदा देवमाने, अल्लाउद्दीन काझी, जुबेर चौधरी, संजय औंधकर, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा विनया पाठक आदी उपस्थित होते.