Tue, Apr 23, 2019 20:20होमपेज › Sangli › 'मराठी भाषा दिन विशेष ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके!’

'मराठी भाषा दिन विशेष ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके!’

Published On: Feb 27 2018 1:57AM | Last Updated: Feb 26 2018 10:28PMसांगली : विवेक दाभोळे

संत ज्ञानेश्‍वर ते कुसुमाग्रजांपर्यंत विविध साहित्यिक, प्रतिभाशाली कविंच्या योगदानाने मराठी भाषेचे वैभव सजले आहे. मात्र  गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मराठी भाषेचे भवितव्य काय, या प्रश्‍नाची चर्चा केली जाते आहे. ‘युनिकोड’च्या जमान्यात आणि इंटरनेटच्या काळात मराठी भाषा सामर्थ्यवान ठरते आहे. फक्त राज्यकर्त्यांनी  ‘मायबोली’ साठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज आहे. राज्यकर्त्यांच्या भूमिकेतील विरोधाभासच ‘मायबोली’ला नडतो आहे. 

वास्तविक पाहता संस्कृती रक्षण, संवर्धन यासाठी मातृभाषा महत्वाचीच ठरते. मात्र मराठी माध्यमांवर इंग्रजी माध्यमाचे आक्रमण, परभाषेतील शब्दांचा मराठीत होत असलेला वाढता वापर, ‘युनिकोड’चा जमाना,  या सार्‍यात मराठी भाषा आपले वैभव हरवू लागली की काय, अशी शंका उपस्थित झाल्याखेरीज राहत नाही.

म्हैसूर प्रांतातील विंध्यगिरी-चंद्रगिरी पर्वतरांगेत गंगराजाचा सेनापती चामुंडराय याने या डोंगररांगेत भगवान बाहुबली यांची अखंड पाषाणातील भव्य मूर्ती उभारली. या मूर्तीच्या पायाशी त्याने ‘चामुंडराये करवियले..श्री गंगराये सुत्ताले करवियले’ हा शिलालेख कोरला. हा मराठी भाषेतील पहिला शिलालेख मानला जातो. आता तर 21 वे शतक सुरू झाले आहे. ज्ञानेश्‍वरांनी मांडलेली ‘अवघे विश्‍वची माझे घर..’ ही संकल्पना आता एका अर्थाने ‘ग्लोबल व्हिलेज’च्या रुपाने साकारू लागली आहे. 

सन 1989 मध्ये शरद पवार, मनोहर जोशी यांच्या पुढाकाराने पहिली जागतिक मराठी परिषद झाली. या परिषदेचे अध्यक्ष होते कवी कुसुमाग्रज! याच परिषदेत कुसुमाग्रजांनी मराठी भाषेची शासनदरबारी होत असलेली उपेक्षा  मांडली होती. 

आता मोबाईल, व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकमुळे घराघरात नव्हे ‘हाताहातात’ पोहोचलेल्या ‘युनिकोड’च्या जमान्यात विविध भाषांतील शब्दांची मराठीवर आक्रमणे होत आहेत. या सार्‍यांतून मराठी भाषेचे रुपडे अशुद्ध होत आहे. याचेदेखील जाणकारांनी भान राखणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया आहे. 

मराठी भाषेला सर्वाधिक धोका हा इंग्रजी माध्यमातील शाळांच्या वाढत्या संख्येमुळे असल्याची ओरड सातत्याने होते. मात्र तज्ज्ञांच्या मते यापेक्षा देखील मराठी भाषेला सर्वाधिक धोका हा मराठी भाषेत अन्य भाषांतील शब्दांचा वाढता वापर हा ठरतो आहे. मात्र याबाबत फारसे कोण काहीच बोलत नाही. ‘मायबोली’च्या संवर्धनासाठी आता साहित्यिकांनी देखील पुढे येणे गरजेचे आहे. किमान यासाठी मराठी साहित्यात आता परभाषांतील शब्दांचा वापर जरी कमी केला तरी त्यातून बरेच काही साध्य होऊ शकते. आता तर इंटरनेटमुळे अवघ्या जगातील ज्ञान एका ‘क्‍लिक’वर आले आहे.  अशा काळात राज्यकर्त्यांनी देखील मायबोलीच्या संवर्धनासाठी जागरुक राहण्याची गरज आहे. 

बडोदे मराठी साहित्य संमेलनातील राज्यकर्त्यांची विसंगत वक्तव्ये पाहिली तर राज्यकर्ते मायबोलीसाठी काय करतात हे दिसून येते. ‘मराठी बोलण्याची कोणावर सक्ती करता येणार नाही’ असे म्हणणारे लगेचच पुढच्याच क्षणाला ‘मराठीला अभिजात भाषेचा  दर्जा मिळण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार’ म्हणतात. जर अशी विसंगत भूमिका राज्यकर्ते दाखवून देत असतील तर मराठी भाषेने राज्यकर्त्यांकडून कोणती अपेक्षा ठेवायची, हा प्रश्‍न उपस्थित झाल्याखेरीज राहत नाही.