होमपेज › Sangli › खुनीहल्ला : पाचजणांना अटक

खुनीहल्ला : पाचजणांना अटक

Published On: Jan 29 2018 1:31AM | Last Updated: Jan 28 2018 11:32PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील गावभागातील कुंभार खिंड येथे स्वप्नील माळी या युवकावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी रविवारी पाचजणांना अटक करण्यात आली होती. शनिवारी दोघांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आतापर्यंत सातजणांना अटक करण्यात आली आहे. यातील पाचजणांना नऊ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

सचिन विलास शिंदे (वय 24, रा. सिद्धिविनायक चौक), अमेय शिवाजी पाटील (वय 21, रा. वखारभाग), प्रतीक राजेंद्र गाडेकर (वय 21, रा. शंभर फुटी रस्ता परिसर) यांना आज अटक करण्यात आली. तर शनिवारी रात्री गुंडा विरोधी पथकाने शिवतेज सुहास सावंत (वय 22, रा. मुजावर मळा, कर्नाळ), सूरज शशिकांत यादव (वय 20, रा. जामवाडी, सांगली) यांना अटक केली होती. या पाचहीजणांना नऊ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

रविवारी रात्री उशिरा सिद्धार्थ सुनील सव्वाशे (वय 19, रा. कर्नाळ चौकी परिसर), संजय गंगाराम गस्ते (वय 21, रा. हनुमाननगर) यांना अटक करण्यात आली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. स्वप्नील शुक्रवारी रात्री कुंभारखिंड येथे मित्रांसमवेत बोलत थांबला होता. त्यावेळी दोन्ही संशयितांसह आठ ते दहाजण चार मोटारसायकलवरून तेथे आले. तेथे त्यांनी त्याला रागाने का पाहतोस, असा जाब विचारला. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. 

वादावादीचे पर्यवसान नंतर मारामारीत झाले. यावेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर चॉपरने वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्यानंतर हल्लेखोर तेथून निघून गेले. यात काहींचा समावेश आहे का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिस उपनिरीक्षक रोहित चौधरी यांनी सांगितले.