Sat, Jul 20, 2019 02:12होमपेज › Sangli › सात महिन्यांच्या बालकाचा विसापुरात गळा दाबून खून

सात महिन्यांच्या बालकाचा विसापुरात गळा दाबून खून

Published On: Feb 27 2018 1:57AM | Last Updated: Feb 27 2018 12:09AMतासगाव : शहर प्रतिनिधी

विसापूर (ता.तासगाव) येथे  आर्यन अर्जुन चव्हाण (वय 7 महिने) या बालकाचा गळा दाबून खून करण्यात आल्याची क्रूर घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी शवविच्छेदन अहवालानुसार व संशयावरून मुलाच्या आई-वडिलांना ताब्यात घेण्यात आल्याचे तासगाव पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
अर्जुन भगवान चव्हाण व सुनीता (दोघेही रा. चव्हाण मळा, विसापूर) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत प्रभारी पोलिस निरीक्षक उमेश दंडिले यांनी दिलेली माहिती अशी : रविवारी रात्री साडेदहापूर्वी आर्यन चव्हाण हा मृत झाल्याची नोंद त्याचे आजोबा दिनकर रामचंद्र तांबवेकर (रा. दुधोंडी, ता. पलूस) यांनी तासगाव पोलिसांत केली होती.  मात्र, यावेळी त्यांनी हा खून असल्याची शक्यता व्यक्‍त करुन शवविच्छेदन करण्याची मागणी केली होती.

यावरुन तासगाव ग्रामीण रुग्णालय येथे आर्यन याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृत्यू हा गळा दाबल्याने झाल्याचे उघड झाले. आर्यनच्या मृत्यूच्या वेळेत चव्हाण यांच्या घरी फक्‍त अर्जुन व सुनिता हे दोघेच होते. यावरुन पोलिसांनी संशयावरुन दोघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत सुरू असलेल्या तपासातून हेही पुढे आले असल्याचे सांगण्यात आले की, अर्जुन व त्याची आई यांचा सुनिता चव्हाण यांच्या चारित्र्यावर संशय होता. सुनिता या गर्भवती राहिल्यापासूनच ‘हे मूल आमचे नाही’, असा सूर त्यांनी धरला होता.

यातूनच अनेकवेळा सुनिता हिचा शारीरिक, मानसिक छळही अर्जुन व त्याची आई करत होती. याला कंटाळून सुनिता या माहेरी गेली होती. मुलगा झाल्यानंतर तरी आता संसार सुखाचा होईल, या अपेक्षेने मुलाच्या जन्मानंतर सुनिता दोन महिन्यानंतर पुन्हा सासरी विसापूर येथे आली होती.

मात्र मुलगा गोरा आहे, माझा रंग सावळा आहे, म्हणून हा माझा मुलगा नाहीच, असा संशय घेऊन पुन्हा तिचा छळ करण्यास सुरूवात झाली. यावेळी भांडणात अनेकवेळा अर्जुन याने ‘तुला आणि तुझ्या मुलाला पण मारुन टाकतो’, अशी धमकीही दिली होती. 

रविवारी सायंकाळी साडे पाच वाजता आर्यन झोपला होता. तो रात्री साडे दहापर्यंत उठला नाही, म्हणून सुनिता ही पाहण्यासाठी गेली. तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. दरम्यान सोमवारी रात्री उशिरापर्यंत सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.