Thu, Jun 27, 2019 02:38होमपेज › Sangli › कुपवाडमध्ये मर्डर विनयभंग, वाटमार्‍या  

कुपवाडमध्ये मर्डर विनयभंग, वाटमार्‍या  

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:14PMकुपवाड : श्रीकांत मोरे

गेल्या तीन ते चार महिन्यात कुपवाड शहरात गुन्ह्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खून, खुनाचे प्रयत्न, विनयभंग, चोर्‍या, वाटमारी अशा घटना लागोपाठ घडत आहेत. यामुळे कुपवाड शहरासह विस्तारित परिसरात दहशतीचे वातावरण आहे. बिघडलेली कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुंड, फाळकूट दादासह इतर गुन्हेगारांवर वचक बसविण्याची गरज आहे.

जिल्ह्यात संवेदनशील पोलिस ठाण्यामध्ये कुपवाडचा समावेश आहे. संजयनगर परिसरातील म्हमद्या नदाफ, मद्या वाघमोडे या गुंडांचे व त्यांच्या टोळ्यांचे आश्रयस्थान म्हणून हे शहर ओळखले जात आहे. हे दोन गुंड कायद्याच्या कचाट्यात चांगलेच अडकले आहेत. तर त्यांच्या टोळीतील इतर गुंड व फाळकूटदादा हे पोलिसांना डोकेदुखी ठरू लागले आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कारवायामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

गुंड मद्या वाघमोडेचा साथीदार राहुल माने व त्याच्या सहकारी गुंडांनी तरुण तुकाराम गुजले याचा किरकोळ कारणावरून खून केला. या टोळ्यांच्या साथीदारांच्या दहशतीच्या जोरावर फाळकूटदादांनी सागर माळी व इंदूबाई माने हिचा खून केला. शहरात सध्या मद्या वाघमोडे व म्हमद्या नदाफची टोळी सक्रिय आहे. या टोळ्यांमधील दहा ते बारा गुंड व फाळकूटदादा शहरात दहशत माजवित आहेत. यांच्या आशीर्वादाने शहरात खुनाचे प्रयत्न, खुनी हल्ले, मारामारी, चोर्‍या आदी घटना घडत आहेत.

गेल्या तीन ते चार महिन्यांत तीन खून, दोन खुनाचे प्रयत्न, वाटमारी, घरफोड्या, विनयभंग या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यापूर्वी कुपवाड पोलिस ठाण्यात सुनील महाडिक व संजय मेंढे यांच्यासारखे चांगले अधिकारी होते. त्यांनी या टोळ्या व त्याच्या आशीर्वादाखाली वावरत असलेल्या गुन्हेगारीचे कंबरडे मोडले होते. त्यांच्या धडाडीचा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी गौरव केला होता. त्यांच्यानंतर गुन्हेगारांनी डोके वर काढले, ते आजही कायम आहे. फोफावलेल्या गुन्हेगारांच्या पिलावळीचा बिमोड करण्यासाठी व गुन्हेगारीचा चढता आलेख कमी करण्यासाठी पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

Tags : sangli, Kupwad, Murder, Molestation, Thieves, Such incident, sangli news,