Thu, Jun 27, 2019 02:34होमपेज › Sangli › पालिकेच्या आज सभापती निवडी

पालिकेच्या आज सभापती निवडी

Published On: Jan 16 2018 2:16AM | Last Updated: Jan 15 2018 11:28PM

बुकमार्क करा
इस्लामपूर : वार्ताहर

इस्लामपूर नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडी आज मंगळवारी होत आहेत. या निवडीत राष्ट्रवादीकडून नव्या चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. विकास आघाडीच्या वाट्यातील एका सभापती पदावरही आता शिवसेनेने हक्क सांगितला आहे. त्यामुळे हे सभापतीपद कोणाला मिळणार, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. 

पालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असल्याने सहापैकी पाच सभापती पदे राष्ट्रवादीकडे तर सत्ताधारी विकास आघाडीकडे केवळ एकच सभापतीपद आहे. गेल्या वर्षभरात राष्ट्रवादीच्या सभापतींनी  चांगले काम केले आहे. नव्या सभापतींची नावे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून सर्वानुमते  निश्‍चित करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे यांनी सांगितले. 

गेल्या वर्षी बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादीच्या  मनिषा पाटील, महिला बालकल्याण सभापतीपदी सुनिता सपकाळ, आरोग्य सभापतीपदी डॉ. संग्राम पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता सभापतीपदी शहाजीबापू पाटील व नियोजनच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष दादासो पाटील यांच्या निवडी झाल्या होत्या. विकास आघाडीचे बाबासाहेब सूर्यवंशी यांची शिक्षण सभापतीपदी निवड झाली होती. तर स्थायी समितीत विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अ‍ॅड. चिमण डांगे व खंडेराव जाधव यांची वर्णी लागली होती.  विकास आघाडीकडे असलेल्या एका सभापती पदावरही शिवसेनेने हक्क सांगितल्याचे समजते.