Wed, Apr 24, 2019 00:04होमपेज › Sangli › मनपाच्या 24 कोटी रस्तेकामात घोटाळा

मनपाच्या 24 कोटी रस्तेकामात घोटाळा

Published On: Jan 05 2018 1:25AM | Last Updated: Jan 05 2018 12:16AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

खड्ड्यांनी हैराण झालेल्या महापालिका क्षेत्रात महापालिकेमार्फत 24 कोटी रुपयांची रस्तेकामे सुरू झाली. पण दर्जाहीन होऊनही बिलांची उधळण सुरू आहे, असा आरोप उपमहापौर गटाचे नेते नगरसेवक शेखर माने यांनी पत्रकार बैठकीत केला. 

मिरजेतील दोन रस्त्यांची कामे निविदेप्रमाणे नाहीत, कमी रुंदी आणि जाडीने करूनही त्याची 70 लाखांची बिले अदा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचे पुरावे आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांच्याकडे दिले आहेत. याप्रकरणी संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा आंदोलन उभारू, असे ते म्हणाले.

माने म्हणाले, शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने महासभेत आवाज उठविल्यानंतर मनपा निधीतून रस्ते करण्याचा निर्णय झाला. सुमारे 24 कोटी निधीतून 35 रस्त्यांची कामे करण्याबाबत ठराव करून कामांना मंजुरी देऊन टेंडर प्रक्रिया राबविली. यानुसार सध्या मनपा निधी आणि नगरोत्थान योजनेतून रस्त्यांची कामे सुरु आहेत. 

ते म्हणाले, मिरज येथील हिरा हॉटेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा वंटमुरे कॉर्नर एल टाईप रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करून सुधारणा करणे हे काम पूर्ण झाले आहे. त्याचे 70 लाखांचे बिलही देण्यात आले आहे. या रस्त्याचे काम दर्जाहीन झाले असून दोन्ही बाजूला गटार मंजूर असूनदेखील केली नाही. रस्त्याची जाडीही कमी ठेवण्यात आली आहे. 

त्याचप्रमाणे मिरजेतीलच बॉम्बे बेकरी ते फायर स्टेशन ते महाराणा प्रताप चौकापर्यंतचा रस्ता हॉटमिक्स करण्याचा होता. त्याचे कामही पूर्ण झाले आहे. या रस्ते कामासाठी दिलेल्या इस्टीमेटमध्ये स्पेसिफिकेशन दिले होते, त्यानुसार काही कामे झाली नाहीत. रस्त्याच्या दुतर्फा गटारी मंजूर असताना त्या गायब केल्या आहेत. काही ठिकाणी 75 एमएम इतकी जाडी हवी असताना ती फक्त 40 एमएम इतकी ठेवली आहे.या कामात मोठा घोटाळा आहे. संबंधित अधिकारी व काही ठेकेदार यांनी संगनमताने पैशाची लूट केली आहे.

शासन निधीतून 33 कोटीची रस्त्याची कामे सुरू झाली आहेत. या रस्त्यांचाही दर्जा तपासण्यात यावा. अन्यथा उपमहापौर गट स्वतंत्र यंत्रणा लावून रस्त्याचा दर्जा तपासेल.